नाशिक /एनजीएन नेटवर्क
हेल्मेट विना दुचाकी चालवणे कायद्याला छेद देणारे असताना आज त्याचे राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यासह शेकडो दुचाकीस्वारांनी उल्लंघन केले. निमित्तं होते, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने नाशकात आयोजित तिरंगा बाईक रॅलीचे. या बाईक रॅलीमध्ये राज्याचे ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विना हेल्मेट बाईक चालवल्याचे पाहायला मिळाले. त्याबाबत कोणीच हेल्मेट घातले नाही म्हणून मी पण घातले नाही असा अजब दावा करीत महाजन यांनी वेळ मारून नेली.
नाशिक शहरामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली पार पडली. मात्र या रॅलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. रॅलीत सहभागी झालेले मंत्री गिरीश महाजन तसेच कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट न घालताच दुचाकी चालवली. यावर मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती नाही, म्हणून हेल्मेट घातले नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. सगळेच लोकं विनाहेल्मेट आहे, म्हणून हेल्मेट घातलं नाही, असंही गिरीश महाजन म्हणाले. मंत्र्यांच्या या उत्तरावर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.