- मंत्री दादाजी भुसे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन तूर्तास स्थगित
** श्रीकांत रौंदळ
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
सटाणा शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भाक्षी रस्त्यावरील रामनगर व डीजीपी नगर परिसरात भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील लेआउट मध्ये वहिवाट रस्ते सोडलेले असताना गेल्या काही महिन्यांपासून चुकीच्या लेआउट मुळे आणि अतिक्रमणामुळे रस्ते बंद झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत. सदर रस्ता तत्काळ मोकळा करून रहिवाशांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो नागरिक, महिलांनी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर काल( दि.२०) तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन करीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान शिवसेनेचे मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून मध्यस्थी करीत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचे सुचित केल्याने बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, तहसीलदार कैलास चावडे आणि पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी मध्यस्थी करून येत्या 30 ऑक्टोबरला दुपारी चार वाजता संबंधित विभाग आणि जागा मालकांच्या उपस्थितीत चर्चा करीत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
भाक्षी ग्रामपंचायतचे लोक नियुक्त सरपंच चेतन वनीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो पुरुष व महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. प्रशासनाने तात्काळ तोडगा न काढल्यास रस्ता मोकळा होईपर्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या टाळाटाळ करण्याच्या भूमिकेमुळे दुपारनंतर आंदोलन संतप्त झाले व आत्मदहनाचा इशारा देत आंदोलन अधिकच आक्रमक बनले.
चुकीचे लेआउट केल्याचा आरोप
सरपंच चेतन वनीस यावेळी म्हणाले की, येथील गट क्र.30, ६७/२ व६७ मधील शिव नाल्यावर चुकीचे ना हरकत प्रमाणपत्र( एन ओ सी) जोडून लेआउट मंजूर करण्यात आले. शासनाची दिशाभूल करून जनतेची सरळ फसवणूक केली आहे. परिणामी रामनगर परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ताच उरलेला नाही. रामनगर, पारिजात कॉलनी, डीजीपी नगर रस्ता हा सटाणा भाक्षी मुख्य रस्त्याला जोडून मिळावा, शिव नाल्यावर नुसती अतिक्रमणच केलेले नाही तर रस्त्याचा सार्वजनिक हक्क असतानाही बेकायदेशीरपणे तारेचे कुंपणही केलेले आहे. प्रशासन याकडे हेतू पुरस्कर पणे डोळे झाक करीत आहे. संबंधित जागा मालकाकडून रहिवाशांवर जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दडपण आणले जात असल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे.
भाक्षी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी सरपंच श्रीकांत रौंदळ, ग्रामपंचायत सदस्य दादा खरे, मयूर वाघ, मनोज खैरनार, तुकाराम बच्छाव यांचे सह संजय कुलकर्णी, भाटेवाल गुरुजी, संदीप भामरे, सागर जाधव, सुनील जाधव, अरविंद वडनेरे, ईश्वर कुमावत, सागर कुमावत, अरुण परदेशी, पंडित खैरनार, संजय सोनवणे, सुलोचना कुमावत, मयुरी जाधव, कस्तुरा रौंदळ, मंदाबाई वाघ, सुनील बुंदेले, पुंजा बाई परदेशी, उज्वला गांगुर्डे, मनीषा गांगुर्डे, पुष्पा आहेर, करण परदेशी, सुवर्णा शिंदे, निर्मला अहिरे आधी सह शेकडो नागरिक व महिला यांनी सहभाग घेतला.
Comments are closed.