मालेगाव/एनजीएन नेटवर्क
सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील पोहाणे येथील नऊ वर्षीय बालकाची हत्या झाल्याच्या घटनेने अवघा तालुका हादरला असतानाच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नऊ वर्षीय कृष्णा सोनवणे याचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
प्राप्त माहितीनुसार, कृष्णा हा गेल्या रविवारी दुपारी दोघा मित्रांसह घराशेजारी खेळत असताना काही वेळानंतर तो एका मित्रासमवेत तिथून दुसरीकडे निघून गेला. तथापि, सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. मात्र तो सापडला नसल्याने त्याचे अपहरण झाल्याची तक्रार वडनेर-खाकुर्डी पोलिसात देण्यात आली. त्याचा शोध सुरु असतानाच पोहाणे शिवारातील जंगलात एके ठिकाणी त्याचा मृतदेह पुरुन ठेवल्याचे गावकऱ्यांना आढळून आले.
कृष्णाचा गळा चिरलेला तसेच मृतदेहासोबत एक चाकूही पुरुन ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे कृष्णाची हत्या करुन मृतदेह पुरुन ठेवला असण्याचा पोलिसांचा कयास आहे. कृष्णा हा अमावस्येच्या दिवशी बेपत्ता झाला होता तसेच त्याच्या डोक्यावरचे केसही काढल्याचे आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असण्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.