नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
रिक्षाचालक पतीने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीचा ओढणीच्या सहायाने गळा आवळून खून केल्याची आणि लगोलग स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबड नजीक चुंचाळे परिसरात उघडकीस आली आहे. चेतन नाना माडकर ( ३३) स्वाती चेतन माडकर (२७) असे मृत दाम्पत्याचे नाव असून त्यांच्या पश्चात तीन अपत्ये आहेत.
प्राप्त माहितीनुसार, व्यवसायाने रिक्षाचालक असलेला चेतन पत्नी आणि मुलांसह पंचवटीतील फुलेनगर भागात राहण्यास होता. त्याला दारूचे व्यसन होते. याच कारणावरून त्याचे पत्नी स्वातीसोबत सतत वाद होत. सततच्या भांडणांना कंटाळून पत्नी माहेरी चुंचाळे परिसरात निघून आली होती. तथापि, चेतन पत्नी आणि मुलांना सतत चुंचाळे येथे येत होता. त्याच्या वागण्यात सुधारणा झाली समजून स्वातीच्या आईने त्याला एक खोली भाडेतत्वावर घेवून दिली. त्यानुसार चेतन या भागात राहू लागला. स्वातीही एका कंपनीत नोकरी करू लागली.
सोमवारी रात्री या दाम्पत्यात काहीतरी कारणाने कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच चेतन याने स्वातीला ओढणीच्या सहायाने गळा आवळून ठार केले आणि स्वतः ओढणीच्या सहायाने गळफास घेत आत्महत्या केली. दोघांच्या मृत्युनंतर मात्र तिघे चिमुरडे पोरके झाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु आहे.
Comments are closed.