नाशिक/एनजीएन नेटवर्क
तीन मुलांसह पतीला सोडून प्रियकरासोबत निघून गेल्याने नैराश झालेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशकात उघड झाली आहे. सतीश रमेश लोहार असे मृत्यूला कवटाळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संबंधित प्रकरणी वडील रमेश लोहार यांच्या फिर्यादीवरून पत्नी विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा अमाबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सतीश रमेश लोहार (३८, रा. नवीन नाशिक) गेल्या काही वर्षापासून पत्नी जागृतीसह नाशिकमध्ये वास्तव्याला होते. विवाह पश्चात त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन आपत्य झाली. सतीश एका खाजगी कंपनीत सेवेत होते. दरम्यान, सतीशची पत्नी जागृती हिचा परिचय एका तरुणाशी झाला. काही काळानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सतीश यांनी पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष करीत प्रियकराला सोडण्यास स्पष्ट नकार दिला. याच मुद्द्यावर दोघांतील वाद विकोपाला गेले. पुढे जागृती तीन मुलांसह पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली. सतीश यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. यामुळे सतीश नैराश्यात गेले आणि त्यांनी गेल्या दोन जुलै रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेनंतर सतीशचे वडील रमेश कडू लोहार यांनी सतीशने बायको जागृतीच्या अनैतिक संबधाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप करीत यासंदर्भातली तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी जागृती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जागृती आणि तिचा प्रियकर फरार असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.