शिमला/एनजीएन नेटवर्क
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाच्या हजेरीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलानमध्ये ढगफुटी झाल्याने त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजधानी शिमल्यात दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच मंडीतल्या पराशर येथील बागी पूल वाहून गेला आहे. ज्यामुळे नदीच्या पलिकडे २५० लोक अडकले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती उत्तराखंडची आहे. उत्तराखंडमधल्या मालदेवता येथील देहरादून डिफेन्स कॉलेजची इमारत कोसळली आहे. राज्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोलान जिल्ह्यातील कंडाघाट उपविभागातील जडोंन गावात ढगफुटीमुळे दोन घरे कोसळली असून त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. बचाव पथकांनी इथे अडकलेल्या दोन जणांना वाचवलं आहे. शिमल्यातील समरहिल येथील शिव मंदिराला भूस्खलनाचा तडाखा बसला आहे. सकाळी येथे पूजेसाठी आलेले २० भाविक मंदिर कोसळल्यानंतर मंदिराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाकडून डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. मंडी येथील नागचला येथे ढगफुटीनंतर पर्जन्यवाहिनीतला बराच कचरा वाहून महामार्गावर आला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागचला येथे ढगफुटी झाली असली तरी येथील रहिवासी घरं, दुकानं, वाचली आहेत. परंतु मंडी ते कुल्लू या दोन ठिकाणांना जोडणारा महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.