NGN News
Latest Marathi News

मोबाईल लोकेशन कसे काम करते ? ( तांत्रिक विश्लेषण/मीनाक्षी जगदाळे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

आजकाल प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल मध्ये लोकेशन हे फिचर उपलब्ध असते. आपला पत्ता इतरांना पाठवताना अथवा आपल्या सुरक्षित असण्याच्या दृष्टीने आपल्या साठी हे फिचर खूप उपयुक्त आहे. लाईव्ह लोकेशन, करंट लोकेशन या दोन्हीचा आपण दैनंदिन जीवनात अनेक कामासाठी वापर करतो.

अनेक जणांचे या फिचरबद्दल गैरसमज आहेत की, आपण जर आपल्या मोबाईल मधील लोकेशन फिचर बंद करून ठेवले तर आपण कुठे आहोत हे कोणाला समजणार नाही.

काउनसेलिंगला येणाऱ्या अनेक प्रकरणात शक्यतो पती-पत्नी च्या नात्यात जिथे एकमेकांवर संशय आहे, जिथे आपला पार्टनर इतर कोणासोबत तरी वेगळ्या ठिकाणी राहतोय भेटतोय, आपल्याला फसवतोय किंवा अगदी महाविद्यालयीन विध्यार्थी जेव्हा क्लास कॉलेज व्यतिरिक्त इतर कुठे फिरत असतात, मित्र मैत्रिणी सोबत चुकीच्या ठिकाणी चुकीच्या कामांना जातात तेव्हा अश्या लोकांना वाटतं आपलं मोबाईल लोकेशन बंद आहे तर कोणालाच समजणार नाही आपण कुठे आहोत. अनेकांना असलेली अर्धवट तांत्रिक माहिती त्यांच्या अज्ञानात भर टाकत असते आणि त्यांना अजून अडचणीत आणत असते. उलट आपले लोकेशन, करंट लोकेशन इतरांशी शेअर करत राहिल्याने आपल्या सोबत होणारा धोका टाळण्यासाठी मदत होते. आपल्यासोबत लूटमार होणे, हत्या होणे, कोणी आपला घातपात करणे, एकटे प्रवास करतांना कोणतेही संकट ओढवणे, निर्जन ठिकाणी नेवून बलात्कार करणे या सारख्या घटनाना आळा घालायचा असेल तर आपला मोबाईल आपल्याला यातून वाचवू शकतो.

तरी एकमेकांना फसवायला, दिशाभूल करायला मोबाईल लोकेशन बंद ठेवून तुम्ही खरच लपून राहू शकतात का? हा एक खूप महत्त्वाचा आणि तांत्रिक प्रश्न आहे. जेव्हा अशी कोणतीही गुन्ह्याची घटना तुमच्या सोबत घडते जिथे पोलीस प्रशासन सहभागी होते त्या वेळेस सोप्या भाषेत सांगायचे तर मोबाईलचे लोकेशन (GPS) बंद केले तरी पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात.

केवळ ‘लोकेशन’ बटन बंद केल्याने तुम्ही पूर्णपणे अदृश्य होत नाही. त्यामागील प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.
मोबाईल टॉवर ट्रायँग्युलेशन (Cell Tower Triangulation)
जेव्हा तुमचा फोन सुरू असतो, तेव्हा तो सतत जवळच्या मोबाईल टॉवरशी जोडलेला असतो. लोकेशन बंद असले तरी, तुमचा फोन कोणत्या टॉवरच्या रेंजमध्ये आहे आणि त्या टॉवरपासून किती अंतरावर आहे, याची माहिती टेलिकॉम कंपनीकडे असते. पोलीस या माहितीचा वापर करून त्या व्यक्तीचे साधारण १०० ते ५०० मीटरपर्यंतचे अचूक लोकेशन शोधू शकतात. IMEI नंबरद्वारे ट्रॅकिंग करणे ही ऐक प्रभावी पद्धत आहे. प्रत्येक मोबाईलला एक युनिक IMEI (International Mobile Equipment Identity) नंबर असतो. सिम कार्ड बदलले तरी, फोन सुरू होताच तो नेटवर्कशी जोडला जातो आणि पोलिसांना त्या फोनचे लोकेशन समजते.
वाय-फाय (Wi-Fi) कनेक्शन लोकेशन शोधायला मदत करते
जर तुम्ही सार्वजनिक किंवा खासगी वाय-फाय वापरत असाल, तर त्या वाय-फायच्या IP Address वरून तुमचे लोकेशन सहज शोधता येते. अनेकदा लोकेशन बंद असूनही बॅकग्राउंडमध्ये ‘Wi-Fi Scanning’ सुरू असते, ज्याचा फायदा तपास यंत्रणांना होतो.
विशेष कायदेशीर अधिकार
गुन्हेगारी तपास किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत, पोलिसांना टेलिकॉम कंपन्यांकडून थेट CDR (Call Detail Record) आणि SDR (Subscriber Detail Record) मिळवण्याचे कायदेशीर अधिकार असतात. याद्वारे व्यक्ती कुठे आहे आणि कोणाशी बोलत आहे, हे रिअल-टाइममध्ये कळू शकते.

यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे लोकेशन बंद केल्यामुळे फक्त गुगल मॅप्स किंवा इतर साध्या ॲप्सना तुमचे ठिकाण कळणार नाही, पण नेटवर्क लेव्हलवर तुमचा फोन ट्रॅक करणे शक्य असते. फोन पूर्णपणे बंद (Switch Off) असेल तरच ट्रॅकिंग थांबते, मात्र फोन पुन्हा सुरू करताच जुने लोकेशन रेकॉर्ड समोर येते. त्यामुळे शक्यतो आपण सुरक्षित राहण्यासाठी, आपल्या जवळील व्यक्तींच्या संपर्कात जास्तीतजास्त राहण्यासाठी मोबाईल मधील सेफ्टी फिचर चा पुरेपूर वापर करा. एखादे चुकीचे काम करतांना, ज्या गोष्टी लपवाव्या लागतील त्या करतांना स्वतःची सुरक्षितता पणाला लावत असाल तरी तांत्रिक प्रक्रियेतून तुमच्या पर्यंत पोलीस, इतर लोक, नातेवाईक पोहचणार आहेतच पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. त्यामुळे सावधान रहा सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या.

( लेखिका नामवंत समुपदेशीका आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9766863443 हा आहे. )

Comments are closed.