इम्फाळ/एनजीएन नेटवर्क
केंद्रीय मंत्र्याच्या घरावर १२०० हून अधिक लोकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री मणिपूरमध्ये घडली आहे. ईशान्येकडील राज्यामध्ये गुरुवारी झालेल्या हिंसाचारामध्ये थेट केंद्रीय मंत्र्याच्या घरालाच लक्ष्य करण्यात आले. मागील अनेक आठवड्यांपासून मणिपूरमध्ये दोन गटांमध्ये वाद सुरु आहे. एसटी वर्गातील आरक्षणामध्ये एका जमातीच्या गटांना सहभागी करुन घेण्याच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या या वादाला हिंसक वळण मिळाले आहे. केंद्रीय मंत्री आर. के. राजन सिंह यांचे इम्फाळमधील घर आंदोलकांनी गुरुवारी रात्री पेटवून दिलं. यावेळेस केंद्रीय मंत्री घरात नव्हते.
आर. के. राजन सिंह यांच्या कोंगबा येथे असलेल्या घरावर हा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे कर्फ्यु जारी करण्यात आलेला असतानाही मोठ्या संख्येनं लोक गोळा झाले आणि त्यांनी हा हल्ला घडवून आणला. हल्ला झाला तेव्हा या घराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या २२ जणांना एवढ्या मोठ्या जमावासमोर घराचं संरक्षण करता आलं नाही. हल्ला झाला तेव्हा या घराच्या आवारामध्ये मंत्र्यांच्या वाहतूक व्यवस्थेमधील ९ जण, ५ सुरक्षारक्षक, ८ अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात होते.
एकूण १२०० हल्लेखोर
सुरक्षेत तैनात असलेल्या या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. जमाव फार मोठ्या संख्येनं होता त्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. घराच्या सर्व बाजूंनी पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. घराची मागील बाजू असो किंवा पुढील गेट असो सर्व बाजूंनी बॉम्बचा मारा होत होता. त्यामुळे या जमावाला नियंत्रणात आणणे शक्यच नव्हते, असे या घराच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेले कमांडर एल. दिनेश्वर सिंह यांनी सांगितले. १२०० लोकांनी हा हल्ला केल्याचा दावा एल. दिनेश्वर सिंह यांनी केला आहे.