नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क
मद्यधुंद अवस्थेतील टवाळखोरांमध्ये मध्यरात्री आपसात वाद झाल्यानंतर काहींनी १६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. टवाळखोरांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवीन नाशिकच्या डॉ. हेडगेवारनगर भागात मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली. टवाळखोरांनी परिसरात उभी असलेली चारचाकी वाहने, रिक्षाच्याही काचा फोडल्या. हा प्रकार काही स्थानिक रहिवाश्यांचा लक्षात आल्यावर त्यांनी घराबाहेर धाव घेत आरडाओरड केली. मात्र संशयित परिसरातून पसार झाले. यात १४ चारचाकी वाहने, एक रिक्षा, एक दुचाकी अशा एकूण १६ वाहनांची तोडफोड झाल्याचे सकाळी लक्षात आले. संशयितांनी कोयता व दगड मारून वाहनांचे नुकसान केले. या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. आमदार सीमा हिरे, माजी नगरसेविका राजश्री ढोमसे यांनी घटनास्थळी भेट देवून नागरिकांना धीर दिला. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दोघांच्या मुसक्या आवळल्या
अंबड पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणी जयेश भालेराव (१९,त्रिमूर्ती चौक), सूरज चव्हाण (१९, दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक) यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक वाघ यांनी सांगितले. वाहन तोडफोड प्रकरणी अंबड पोलीस जीवे मारण्याचा प्रयत्न, शस्त्र अधिनियमासह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.