NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी घराघरात सुसंवाद हवा : शिवरत्न शेटे

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियाचा प्रचंड प्रमाणावर वापर वाढला असून घरात आणि बाहेर, अगदी सर्वत्र प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने प्रत्यक्ष सुसंवाद खुंटला आहे. सहाजिकच आपण कोणाजवळही प्रत्यक्षपणे भावना व्यक्त करत नाही, विशेषतः तरुणपिढीच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होते. याची पालकांना माहिती किंवा कल्पना नसते, यासाठी घराघरात प्रत्यक्ष सुसंवाद वाढायला हवा, तरुण मुलांच्या मनात काय भावभावना येत आहेत, याची जाणीव ठेवून त्यांचे समायोजन व्हायला हवे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी केले.

गंगापूररोड कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या शताब्दी वर्षातील पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, माजी नगरसेविका तथा कार्याध्यक्षा डॉ. अश्विनी बोरस्ते, संयोजक प्राचार्य प्रशांत पाटील, लेखक प्रा.शंकर बोऱ्हाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत खैरनार आदि उपस्थित होते.

शेटे म्हणाले, आजच्या काळात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. विशेषतः तरुणांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी यासारख्या प्रश्नांवर वाचा फोडायला हवी. समाजाला घातक ठरणारी बेताल आणि बेधडक वक्तव्य करून गावागावात, शहरांमध्ये आणि अनेक प्रांतांमध्ये घरे जाळण्यापेक्षा चुली पेटविणे किंवा कोणाचा संसार उभे करणे हे आजच्या काळात अधिक महत्त्वाचे आहे, असे विधायक करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव व्हायला हवा. गिरणा गौरव प्रतिष्ठांच्या वतीने निरंतरपणे सातत्याने शंभर वर्ष व्याख्यानमाला चालविणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव होतोय ही अत्यंत कौतुकास्पद आणि आनंददायी गोष्ट आहे, असेही शेटे म्हणाले यावेळी शिवरत्न शेटे यांनी सध्याच्या घडणाऱ्या आत्महत्या विषयावर आपले विचार मांडले. कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई सारख्या एका महान कलावंताने आत्महत्या करावी, ही समाजासाठी अत्यंत वेदनादायी गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या काळात शिवचरित्राचा केवळ वाचन करून उपयोग नाही ,तर त्याचा अभ्यास व्हायला हवा. विशेषतः तरुणांनी शिवचरित्राचा अभ्यास करून, छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण आयुष्यात किती संघर्षमय गोष्टींना तोंड द्यावे लागले, याचा विचार करावा, असे सांगून त्यांनी शिवचरित्रातील अनेक दाखले दिले.

यांचा झाला गौरव

याप्रसंगी गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आणि शिवरत्न शेटे प्रमुख पाहुणे शिवरत्न शेटे यांच्या हस्ते वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, तसेच पदाधिकारी विजय हाके, उषा तांबे, संगीता बाफना, मनीष सानप, हेमंत देवरे, गणेश भोरे, हेमंत तुपे, अविनाश वाळुंजे, कृष्णा शहाणे, कांतीलाल तातेड, संदीप नाटकर, सुनील गायकवाड आदींचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी मनोगत व्यक्त करताना मालेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. आता ही व्याख्यानमाला ‘लोकल टू ग्लोबल ‘ झाली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंदा संपूर्ण जगभरात या व्याख्यानमालेचा लाभ रसिकांनी घेतल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन स्मिता मालपुरे यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.