मुंबई/एनजीएन नेटवर्क
जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरण आणि गेल्या काही सत्रातील तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३३ अंशाच्या घसरणीसह विसावला. उल्लेखनीय म्हणजे, सेन्सेक्स नकारात्मक पातळीवर स्थिरावला असला तरी दुसरीकडे मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल बुधवारच्या सत्रात ३०० लाख कोटींच्या ऐतिहासिक विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३.०१ अंशांनी घसरून ६५,४४६.०४ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने २२२.५६ अंश गमावत ६५,२५६.४९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९.५० अंशांची वाढ झाली आणि तो १९,३९८.५० या विक्रमी उच्चांकी पातळीवर स्थिरावला. दिवसभरात निफ्टीने १९,४२१.६० ही सत्रातील उच्चांकी तर १९,३३९.६० अंशांचा नीचांक गाठला. जागतिक प्रतिकूलतेसह चिंतेसह सेवा क्षेत्राने तीन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठल्याने देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीची घोडदौड थांबली. दुसरीकडे अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध तीव्र झाल्याने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर अनिश्चिता निर्माण होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला होता. दिवसातील बहुतांश काळ बाजार नकारात्मक पातळीवर राहिला. मात्र अखेरच्या काही तासात बँकिंग आणि वित्त कंपन्यांच्या समभागातील खरेदीने घसरण काहीशी कमी झाली.