त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे
त्र्यंबकेश्वर शहरात पहिल्या पावसाची हजेरी मे महिन्याच्या उत्तरार्धात लागल्यानंतर चक्क जूनच्या शेवटच्या आठवडय़ात 26 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. या पाच दिवसात त्र्यंबक सह तालुक्यात समाधानकारक पाउस पडला. मात्र शुक्रवारी (दि. 30) त्र्यंबकेश्वर शहरात 65 मिमी पाऊस पडला. तर 4 दिवसांत शहरात एकूण 190 मिमी पाऊस पडला. त्र्यंबक तालुक्यात पावसाची रिडींग तीन मंडळमध्ये केली जाते. त्यात त्र्यंबकेश्वर, वेळुंजे व हरसूल या तीन ठिकाणी पावसाची रिडिंग घेतली जाते. त्र्यंबकेश्वर शहरात काल दि.30 जूनपर्यंत एकुण पाऊस 190 मिमी पडला आहे. वेळुंजे 30 जूनपर्यंत 282 तर हरसूल 288 मिमि पडला आहे. म्हणजे तालुक्यात 30 जूनपर्यंत एकुण 760 मिमी पाऊस पडला आहे.
दरम्यान, आज त्र्यंबक शहरात मुसळधार पाऊस पडून ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी अवस्था झाली होती. पावसाळापूर्व नाले सफाई नगरपरिषदेच्या ठेकेदारी कर्मचा-यांनी केली, मात्र ती थातूरमातूर स्वरुपात केली. वरवर सफाई करण्यात आली. अगदी इमाने इतबारे काम केले असते तर गावात पुरे आला नसता. जिथे ख-या अर्थाने साफ सफाईची गरज होती तेथे केली नाही आणि जेथे गरज नव्हती तेथील सफाई केल्याने तेलीगल्ली, कुशावर्त तीर्थ परिसर, मेनरोड, भाजी मंडई, त्र्यंबकेश्वर मंदिरा समोर, बसस्थानका समोरील रस्त्यावर व नगर परिषदेसमोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन पुराचे पाणी वाहत होते. वरुन पाऊस व खाली पुराचे पाणी यामुळे दर्शन करणारे भाविक, स्थानिक लोक, व्यावसायिक, शाळेत जाणारी मुले मुली आदींची तारांबळ उडाली होती. सतत पाच दिवस पावसाची संततधार सुरु आहे. मात्र आज तर पावसाने कहरच केला होता. सर्वांची तारांबळ उडवून दिली. पावसामुळे ब्रह्मगिरी, अंजंनेरी डोंगरावरुन जोरदार धबधबे सुरु झाल्याने पर्यटकांची गर्दि वाढु लागली आहे.