मुंबई/एनजीएन नेटवर्क
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने राज्यात जोर धरला आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे. तर, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. मात्र, राज्यात आता पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. अरबी समुद्राकडून येणारे तीव्र पश्चिमी वारे बाष्प घेऊन येत असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाट माथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया याभागातही येत्या काही दिवसांता मुसळधार पाऊस बरसणार आहे.