नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये अधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण 12 राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण आणि ओडिशामधील अनेक ठिकाणी फार जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमधील याच परिस्थितीमुळे तेलंगण, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्याच्या भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या ठिकाणी 115.6 ते 204.4 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो. हिमाचल प्रदेश, राजस्थानच्या पूर्वेकडील भाग, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे, मराठवाडा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पॉण्डेचेरीमध्ये 64.5 ते 115.5 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.