लातूर/एनजीएन नेटवर्क
येथील अविष्कार कासले याने राजस्थानातील कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोटा येथील तलवंडी भागात हा विद्यार्थी तीन वर्षांपासून राहत होता. तो येथे नीटची तयारी करत होता. त्याची आजीही त्याच्यासोबत दीड वर्षांपासून राहत होती. रविवारी तो रस्ता क्रमांक एक येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षेला देण्यासाठी आला होता.
प्राप्त माहितीनुसार, अविष्कार याने कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्याने वर्गात बसूनच परीक्षा दिली होती. परीक्षा संपताच तो बाहेर आला आणि बाल्कनीतून खाली उडी मारली. तो सहाव्या मजल्यावरून सुमारे 70 फूट खाली पडला. त्यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर जखमा झाल्या. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली, असे पोलीस उपअधीक्षक धरमवीर सिंह यांनी सांगितले. या घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. एका फुटेजमध्ये विद्यार्थी पाचव्या मजल्यावरून सहाव्या मजल्यावर धावताना दिसत आहे. दुसऱ्या फुटेजमध्ये तो उडी मारल्यानंतर पडताना दिसत आहे.
कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. दरम्यान, आता कोटाच्या सर्व कोचिंग क्लासेसमधील परीक्षा दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.