छत्रपती संभाजीनगर/एनजीएन नेटवर्क
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना औरंगाबाद खंडपीठाने दणका दिलाय. एका जुन्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे. इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून लिंगभेदाबाबत एक वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या वादानंतर इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणी इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. हायकोर्टाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनावेळी सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते असे विधान केले होत. मात्र हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप करत त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायालयाने दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होत. या निर्णयाला याचिककर्त्याने खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे आणि सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. त्यामुळं आता खंडपीठाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.