नाशिक/एनजीएन नेटवर्क
समृध्दी महामार्गाचा सिन्नरच्या पुढचा टप्पा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होईल आणि मे २०२४ पर्यंत वडपेपर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री दादा भुसे यांनी दिली. समृध्दी महामार्गाच्या कामात घाई गडबडीचा विषयच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरणही भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
समृध्दी महामार्गाच्या कामात सिंगापूरची यंत्रणा वापरली जात आहे. या भागातील पुलावर ११५ ते १२० कॉलम आहेत. त्यापैकी ९४ कॉलमचे काम या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण झाले होते. केवळ १६ कॉलमचे काम बाकी असताना ही घटना घडली. उच्च तंत्रज्ञान व मोठी क्षमता असलेले काम संबंधित कंपनी करीत आहे. दिवसा व रात्री काय काम करायचे याचे नियोजन त्यांच्यामार्फत केले जाते. या यंत्रणेच्या वापरातून आजवरचे काम झाल्याकडे भुसे यांनी लक्ष वेधले. हा अपघात कशामुळे झाला, याचा निश्चितपणे शोध घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.