NGN News
Latest Marathi News

‘मविप्र मॅरेथॉन’ जेतेपदावर हरयाणाच्या मनोज कुमार याची मोहोर

  • नाशिकच्या कमलाकर देशमुखने पटकावले हाफ मॅरेथॉनचे विजेतेपद
  • कडाक्याच्या थंडीतही मविप्र मॅरेथॉनमध्ये धावले हजारो स्पर्धक

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवार दि.११ जानेवारी रोजी पार पडलेल्या १० व्या राष्ट्रीय व १५ व्या राज्यस्तरीय ‘मविप्र मॅरेथॉन २०२६’ स्पर्धेतील फूल मॅरेथॉनचे (४२.१९५ किमी) विजेतेपद हरयाणाच्या मनोज कुमार या सैन्य दलातील जवानाने पटकावले. तर हाफ मॅरेथॉनचे (२१ किमी) पहिले पारितोषिक नाशिक जिल्ह्यातील कमलाकर लक्ष्मण देशमुख याने पटकावले.

कडाक्‍याच्या थंडीत रविवारी (दि.११) पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. वेगवेगळ्या १४ गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तब्बल पाच हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदविला.

४२.१९५ किलोमीटर फूल मॅरेथॉनने स्पर्धेला सुरवात झाली. कुस्तीपटू तथा ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त, आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. संदीप गुळवे, रवींद्र देवरे, डॉ. सयाजीराव गायकवाड, प्रवीण जाधव, ॲड. लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, अमित बोरसे, डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. आर. के. बच्छाव, नंदकुमार बनकर, कृष्णाजी भगत, विजय पगार, रमेश पिंगळे, शोभाताई बोरस्ते, शालनताई सोनवणे, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, प्रा. सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.


फूल मॅरेथॉनमध्ये धावताना मनोज कुमारेने २ तास २० आणि २७ सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख ५१ हजार रूपयांचे पारितोषिक पटकावले. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सिकंदर चिंधू तडाखे या धावपटूने २ तास २४ मिनिटे ४९ सेकंद अशी वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकाचे एक लाखाचे तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील चांगदेव हिरामण लाटे या धावपटूने २ तास २४ मिनिटे ५० सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांकाचे ७५ हजारांचे पारितोषिक पटकावले.

मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. कल्पना अहिरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा, तर सौरभ टोचे, हेमंत काळे यांनी सत्कारार्थींचा परिचय करून दिला. डॉ. तुषार पाटील यांनी सूत्रसंचलन केले. संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी आभार मानले. क्रीडा संचालक मिनाक्षी गवळी, हेमंत पाटील, अनिल उगले, कल्पना नाईकवाडी, कैलास लवांड, प्रा. महेश कारे, डॉमंगल शिंदे यांनी विजेत्यांच्या यादीचे वाचन केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. डी. डी. लोखंडे,  डॉ. विलास देशमुख, प्रा. दौलत जाधव, डॉ. के. एस. शिंदे, डॉ. अजित मोरे, शशिकांत मोगल, प्राचार्य डॉ. कल्पना अहिरे यांच्यासह आयोजन समितीच्या डॉ. मीनाक्षी गवळी, प्रा. हेमंत पाटील, प्रा. डॉ. सुनील धोंडगे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गडाख, प्रा. हेमंत काळे, मंगल शिंदे, डॉ.नामदेव काकड, प्रा. पूनम महाजन, कल्पना कानवडे, सुरेश कुंभार्डे आदी क्रीडाशिक्षकांसह शाखाप्रमुख, सेवक यांनी परिश्रम घेतले.

——-
खेळाकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे. एखाद्या खेळामध्ये चांगली कामगिरी केल्यास अशा विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीची संधी असते. त्यासाठी पालकांनीदेखील मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मविप्र संस्था अशा मुलांच्या कायम पाठीशी असून, आवश्यक ते पाठबळ दिले जाते. मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ आणि आयोजन समितीने अत्यंत सूक्ष्म व काटेकोर नियोजन केलेले होते. धावणमार्ग मापनापासून ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्यानेच दरवर्षीप्रमाणे यंदाचीही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. यापुढे आणखी जोमाने स्पर्धा अशाच प्रकारे यशस्वी करण्याचा सर्वांनी संकल्प करावा.
ॲड. नितीन ठाकरे, आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्रचे सरचिटणीस.

—–
प्रत्येक खेळाडू जेव्हा स्पर्धा करतो, तेव्हा तो सर्वप्रथम स्वतःशीच स्पर्धा करतो. आपण शिस्तबद्ध राहिलो, तंदुरुस्त राहिलो तर देश प्रगती करेल. सर्वजण फिट असतील तर देश पुढे जाईल. जे काही करायचे आहे ते देशाला समोर ठेवून करा. देशाची ताकद त्याच्या खेळाडूंमधूनच ओळखली जाते. जीवनात काहीही साध्य करायचे असेल तर गुरूशिवाय ते शक्य होत नाही, मग ते खेळ असो वा शिक्षण. मी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो. ज्यांना यावेळी यश मिळाले नाही त्यांनीही प्रयत्न सुरूच ठेवावेत, नक्कीच विजय मिळेल.
योगेश्वर दत्त, ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू

——-
स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन – सुधीर इनामदार
भारतीय ॲथलेटिक्स संघटनेद्वारे नियुक्त करण्यात आलेले स्पर्धा निरीक्षक सुधीर इनामदार म्हणाले कि, मविप्रने स्पर्धेचे नियोजन अत्यंत सूक्ष्म आणि उत्कृष्ट केले. एखाद्या शैक्षणिक संस्थेने अशाप्रकारे भव्य स्वरुपात स्पर्धेचे आयोजन करणे ही वाखाणण्याजोगी व अभिमानास्पद बाब असल्याचे इनामदार म्हणाले.

 ‘फन रन’द्वारे मतदान जनजागृती
यंदाच्या स्पर्धेत वेगवेगळ्या थिमवर आधारित ‘फन रन’ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यामध्ये मतदान जनजागृती, पर्यावरण रक्षण, बेटी बचाव-बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा, झाडे लावा-झाडे जगवा, महिला सक्षमीकरण, निरोगी आरोग्य, योग, जागर शिक्षणाचा या सामाजिक विषयांवर जनजागृतीपर फलक हाती घेऊन स्पर्धक सहभागी झाले होते.

नितीन मुजुमदार यांना पत्रकार पुरस्कार प्रदान
संस्थेच्या वतीने मविप्र मॅरेथॉननिमित्त गेल्या सात वर्षांपासून आदर्श क्रीडा पत्रकार पुरस्कार प्रदान केला जातो. विविध वृत्तपत्र आणि चॅनल्सच्या माध्यमातून आपल्या उत्कृष्ट लिखाणाद्वारे क्रीडा क्षेत्राची सेवा करणारे ज्येष्ठ मुक्त पत्रकार नितीन मुजुमदार यांना यंदाचा ‘आदर्श क्रीडा पत्रकार पुरस्कार’ याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पाच हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाविद्यालये, रुग्णालयांचा गौरव
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात सर्वोच्च सहभागाबद्दलचे प्रथम पारितोषिक पिंपळगाव महाविद्यालय, द्वितीय पारितोषिक कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय यांना, तृतीय पारितोषिक कृषी महाविद्यालयास देण्यात आले. रुग्णवाहिका सेवा पुरस्कार अपोलो हॉस्पिटल, साईबाबा हॉस्पिटल आणि रेडक्रॉस हॉस्पिटल यांना प्रदान करण्यात आला.

• आजच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा स्पर्धक आणि प्रमुख मान्यवर हे दोन्ही खेळाडू हरयाणा येथील रहिवासी आहेत, हा दुर्मिळ योगायोग आहे.  
• स्पर्धेसाठी देशभरातील उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील धावपटू असे एकूण पाच हजारांवर स्पर्धक सहभागी झाले होते.
• नाशिकच्या सिकंदर तडाखे याने सलग तिसऱ्या वर्षीही दुसरा क्रमांक कायम ठेवत  या स्पर्धेतील फूल मॅरेथॉनमध्ये दुसरा क्रमांक मिळविण्याची हॅट्ट्रिक केली.
• खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून खेळाडू आणि उपस्थित नागरिकांचा उत्साह वाढविला. रावसाहेब थोरात सभागृह परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाने रंगत वाढवली होती .
• बक्षीस वितरण समारंभ कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. यावेळी विविध १४ गटांतील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एकूण ८ लाख ५८ हजार रुपये रकमेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

गटनिहाय प्रथम तीन विजेते
१) फुल मॅरेथॉन (४२.१९५ किमी) : मनोज कुमार (प्रथम, पानिपत, हरयाणा), सिकंदर चिंधू तडाखे (द्वितीय, नाशिक महाराष्ट्र), चांगदेव हिरामण लाटे (तृतीय, अहिल्यानगर, महाराष्ट्र)

२) हाफ मॅरेथॉन (२१ किमी) :  कमलाकर लक्ष्मण देशमुख (प्रथम, नाशिक, महाराष्ट्र), राज राधेश्याम तिवारी (द्वितीय, मुंबई), रोहित वर्मा (तृतीय, रेवारी, हरयाणा)

३) महिला खुला वर्ग (१० किमी) : साक्षी अनंत कसबे (प्रथम, नाशिक, महाराष्ट्र), प्रियंका लालसू ओक्सा (द्वितीय, नाशिक, महाराष्ट्र), रिंकी धन्या पावरा (तृतीय, नंदुरबार)

४) पुरुष खुला गट (१० किमी) : सौरभ सौरभ सौरभ (प्रथम, हरयाणा), कृपाशंकर लालमनी कुमार (द्वितीय, नाशिक), अतुल शांताराम बर्डे (तृतीय, नाशिक)

५) २५ वर्षाआतील मुले (१२ किमी) : कार्तिककुमार चाम्रुजी कारीहारपाल – (प्रथम, नाशिक), दिलीप जनार्दन महाले (द्वितीय, नाशिक), रूपसिंग जन्या वसावे (तृतीय, नंदुरबार)

६) १९ वर्षाआतील मुले (१० किमी) : गोविंद प्रकाश पाडेकर (प्रथम, नाशिक), सुरज जयराम माशी (द्वितीय, नाशिक), अनिल संजय जाधव (तृतीय, नाशिक)

७) १९ वर्षाआतील मुली (५ किमी) : पौर्णिमा बळवंत भोये (प्रथम, त्र्यंबकेश्वर, नाशिक), वंदना पंडित तुंबडे (द्वितीय, त्र्यंबकेश्वर, नाशिक), तेजस्विनी यशवंत भोये (तृतीय, नाशिक),

८) १७ वर्षाआतील मुले (५ किमी) : हर्ष प्रमोद पाटील (प्रथम, छत्रपती संभाजीनगर), साहिल प्रकाश पवार (द्वितीय, दिंडोरी, नाशिक), आकाश रामेश्वर राठोड (तृतीय, जालना)

९) १७ वर्षाआतील मुली (४ किमी) : लावण्या सुभाष नगरकर (प्रथम, चंद्रपूर), वैष्णवी संदीप आहेर (द्वितीय, नाशिक),  रुचिका सुनील नगरकर (तृतीय, चंदपूर)

१०) १४ वर्षाआतील मुले (४ किमी) : प्रतिक प्रवीण जवळे (प्रथम, नाशिक), तेजस त्र्यंबक मोंढे (द्वितीय, अंजनेरी, नाशिक), आदित्य दिनेश पाटील (तृतीय, नाशिक)

११)१४ वर्षाआतील मुली (३ किमी )  : गौरी मनोज चौधरी (प्रथम, नाशिक), दिव्या विजय यादव (द्वितीय, नाशिक), कल्याणी बळवंत भोये ( तृतीय, नाशिक)

१२) २५ वर्षाआतील मुली (६ किमी) : ताई हिरामण बामणे (प्रथम, नाशिक), पूजा प्रभाकर पारधी (द्वितीय, नाशिक), मोनिका जगन निल्पुंगे (तृतीय, नाशिक)

१३) ६० वर्षावरील पुरुष (६ किमी)  : रवींद्र सूर्यभान पाटील (प्रथम, जळगाव), वसंत कचरू आहेर (द्वितीय, नाशिक), सूर्यकांत दामोदर भोसले (तृतीय, नाशिक)

१४) ३५ वर्षावरील महिला (६ किमी) : निवृत्ती दत्ता बोरसे (प्रथम, जव्हार), प्रीती राजेंद्र वाघ (द्वितीय, नाशिक), शीतल राहुल संघवी (तृतीय, नाशिक)

१५) २ किमी – ओपन फन रन (ही स्पर्धा आरोग्य व सामाजिक विषयांवर होती)

Comments are closed.