NGN News
Latest Marathi News

लासलगाव–विंचूर रस्त्यावरील ‘त्या’ वृक्षतोडीला हरित सेनेचा विरोध

** राकेश बोरा

लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

विंचूर ते लासलगाव या सुमारे पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेकडो वर्षे जुन्या झाडांची तोड सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष अडथळा न ठरणारी झाडे तोडू नयेत, अशी मागणी शहरातील हरित सेनेने केली आहे.

चौपदरी रस्ता होणे आवश्यक असले तरी पर्यावरणाचे नुकसान टाळणे तितकेच आवश्यक आहे. झाडांची कत्तल करून विकास साधता येणार नाही, हे हरित सेनेचे म्हणणे आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली अनावश्यक वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लासलगाव – विंचूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षे जुनी झाडे तोडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मात्र, ज्या झाडांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही, अशी झाडे तोडण्यास हरित सेनेचा तीव्र विरोध आहे.विंचूर–लासलगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ७० हून अधिक शेकडो वर्षे जुनी झाडे सध्या तोडली जात असल्याचे चित्र आहे. एकीकडे रस्ता रुंद झाल्याने अपघात टाळण्यास मदत होणार असली, तरी मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे संपूर्ण रस्ता भकास आणि उघडा दिसू लागला आहे. या रस्त्यावर हरित सेनेच्या वतीने कडुनिंबाची झाडे लावण्यात आलेली आहेत. नव्याने होणाऱ्या रस्त्याची नेमकी रुंदी अद्याप अनेकांना माहित नसल्याने भविष्यात ही झाडेही तोडली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता बांधताना ज्या झाडांमुळे अडथळा येणार नाही, ती झाडे तोडण्याचे टाळावे, अशी मागणी हरित सेनेने केली आहे.

——

हरित सेनेच्या वतीने शहर हरितीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचे दुःख होत आहे

संतोष पलोड, उद्योजक, सदस्य, हरित सेना

Comments are closed.