NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

गुरूची शिष्याला बालेकिल्ल्यातच ललकार.. ( सारीपाट/मिलिंद सजगुरे)

0

** एनजीएन नेटवर्क

        साडेपाच दशकांच्या राजकीय अनुभवाची शिदोरी सोबत असताना स्वतः जन्माला घातलेल्या पक्षाची शकले उडाल्याचे शल्य शरद पवारांना चांगलेच सतावत असल्याचे पक्षफुटीनंतरच्या त्यांच्या नमनाच्या दौऱ्यात पुरेपूर अधोरेखित झाले. बरं, पक्षाला भगदाड पडण्याची मर्दमुकी अन्य कुणी गाजवली असती तर समजण्याजोगे होते; मात्र, घरातील व्यक्तीनेच हे महत्कार्य करावे आणि तेदेखील आपल्या तालमीत घडलेल्या पैलवानांच्या साथसंगतीने, ही बाब पवारांना रुचनेच अशक्यप्राय आहे. स्वकीयांच्या या अनपेक्षित घातकी कृत्यापोटी जखमी झालेला हा ८३ वर्षीय योद्धा म्हणूनच मराठी मुलुख पिंजून काढण्याच्या जिद्दी भूमिकेने मैदानात उतरलाय. स्वतःची राजकीय भूमिका विशद करणे आणि आगामी निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसणाऱ्या कधीकाळच्या आपल्या सवंगड्यांचा पाडाव करणे, हा पवारांचा दौऱ्यामागील दुहेरी उद्देश आहे. शरद पवार-छगन भुजबळ तसे गुरु-शिष्याचे नाते. त्याच अनुषंगाने आधी शिष्योत्तमांना धडा शिकवण्याचा विडा उचलत पवारांनी प्रथमतः भुजबळ यांच्या येवल्यात धडक दिली. इथल्या सभेत कडवट टीकेचे प्रहार न करता ‘आपली निवड चुकल्याची’ आणि त्यापोटी ‘येवलेकरांची क्षमा मागण्यासाठी आल्या’चे भावनिक वक्तव्य करीत पवारांनी स्थानिकांना योग्य तो संदेश दिला. पवारांची हीच पेरणी धोक्याची घंटा मानून भुजबळ यांना आगामी वाटचालीत सावध पावले टाकण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागणार आहे.   

  शनिवारची पवार यांनी येवल्यात घेतलेली सभा खरेतर शक्तीप्रदर्शनच होते. स्वतःच्या इशाऱ्यावर तालुक्यातील नेते आणि मतदारांना डोलवण्याची क्षमता बाळगून असलेल्या छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमध्ये पवारांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेवून सभा यशस्वी करून दाखवली. सभेने पवारांना जसे हायसे वाटले, तेव्हढेच उपस्थित जनांच्या उत्साहाने भुजबळ विरोधकही सुखावले असणार. एक सुरक्षित मतदारसंघ म्हणून आपणच भुजबळ यांना येवला मुक्कामी पाठवले, असे सांगून पवारांनी या मतदारसंघावर असलेला विलक्षण स्नेह बोलून दाखवला; शिवाय, इथल्या नेते आणि जनतेसाठी आजही आपला शब्द प्रमाण असल्याचे भुजबळ यांना अप्रत्यक्षरीत्या दर्शवून दिले. येवल्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका वठवणाऱ्या माजी आमदार मारोतराव पवार, आ. नरेंद्र दराडे, माणिकराव शिंदे आणि अंबादास बनकर या चौकडीची व्यासपीठावरील उपस्थिती पवारांसाठी बेरजेची आणि भुजबळ यांच्यासाठी काळजीची ठरावी. तालुक्यातील वंजारी आणि माळी समाजाचा प्रभाव आजवर भुजबळ यांच्यासाठी दर निवडणुकीत बलस्थान ठरला आहे. त्याच अनुषंगाने जितेंद्र आव्हाड तसेच खा. अमोल कोल्हे यांना सोबत ठेवून त्यांच्या भाषणांचे सोपस्कार पाडणे, हीदेखील पवारांची दूरदृष्टीच म्हणावी लागेल.

   आपल्या तेरा मिनिटांच्या अल्पवेळच्या भाषणात पवार हे भुजबळ यांच्याबाबत काही गौप्यस्फोट करतील किंवा कठोर टीकेचे बाण तरी सोडतील, अशी उपस्थितांची अपेक्षा असावी. मात्र, तसे करून भुजबळ यांना कोणतीही सहानुभूती न मिळू देण्याची पुरती खबरदारी पवार यांनी घेतल्याचे स्पष्ट झाले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईच्या माझगावात पराभूत झालेल्या भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन येवल्यात करण्याची किमया आपणच साधली, मात्र आपण दाखवलेल्या विश्वासाला ते पात्र राहिले नाहीत, हेच आपल्या भाषणातून उधृत करण्याचा पवार यांनी प्रयत्न केला. आपली कार्यक्षमता लक्षात न घेता वयाची ८३ गाठल्याचा वारंवार ‘उद्धार’ केला जात असल्याबद्दल पवार यांनी पुतणे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर कोरडे ओढताना दिलेला इशाराही सूचक ठरावा. आपल्या भाषणातील जनार्दन पाटील आणि मारोतराव पवार या माजी आमदारांसह अंबादास बनकर यांचा केलेला उल्लेख पवारांच्या तल्लख आणि समयसूचक बुद्धीकौशल्याचे प्रत्यंतर देणारा ठरला.

 पक्ष फुटीनंतर शरद पवार यांनी येवल्याची निवड करणे राजकीय अंगाने महत्वपूर्ण ठरणार आहे. छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना नेहमीच राजकीय गुरूची उपाधी दिली आहे. मात्र, पक्ष सोडताच गुरुवर शरसंधान करण्यात शिष्याने थोडीही कसूर सोडली नाही. बाळासाहेबांच्या बाबतीत झाले, त्याचीच पुनरावृत्ती पवारांबाबत झाली. भुजबळ हे अजित पवार गटाच्या वळचणीला गेल्याने पवार यांना धक्का बसणे स्वाभाविक होते. आगामी निवडणुकांत ते ‘दादा’ गटाचे स्टार प्रचारक असतील. त्यावेळी ते अधिक त्वेषाने आरोपांची सरबत्ती करू शकतात, याची जाणीव पवारांना आहे. यासाठीच त्यांना येवल्यात संघर्षमय परिस्थिती निर्माण करून मतदारसंघातच जखडून ठेवण्याचे पवारांच्या अजेंड्यावर असावे. २०२४ ची विधानसभा निवडणूक पवार यांच्या इतकीच भुजबळ यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. तीमध्ये तालुक्यातील बिनीचे नेते विरुद्ध भुजबळ असे द्वंद्व रंगणार, हि काळ्या दगडावरील धवलरेषा ठरेल. आताचा पवारांचा दौरा, त्यांनी बांधलेली विरोधकांची मोट आणि आपल्याला येनकेन पराभूत करण्याची घेतलेली आण या बाबी लक्षात घेता भुजबळ आता नेमकी काय रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काहीही असले तरी येवल्यातील पुढची प्रत्येक निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची ठरून विधानसभेप्रसंगी इथली लढत ‘हाय व्होल्टेज’ श्रेणीतील असेल, यामध्ये मात्र शंका नाही. भुजबळ या सर्व परिस्थितीची कशी हाताळणी करतात, याकडे उभ्या राज्याचे लक्ष लागून राहील.        

Leave A Reply

Your email address will not be published.