मुंबई/एनजीएन नेटवर्क
ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
मराठी साहित्य क्षेत्रात अतिशय मोलाचे कार्य असणाऱ्या प्रा.हरी नरके यांनी देशाच्या ओबीसी चळवळीत वैचारिक प्रबोधन करून समाजात जनजागृती करण्याचे मोठ काम त्यांनी केल. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत त्यांनी संघटनेसाठी भरीव असं काम केल. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडत असतांना राज्यात आणि देशभरात त्यांनी वैचारिक प्रबोधन करून संघटन अधिक मजबूत केलं. ओबीसींवर जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांनी आपल्या लेखनातून, भाषणातून वाचा फोडली.
प्रा.हरी नरके यांनी पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन केंद्रात प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केल. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्याचं उल्लेखनीय काम होत. आपल्या विपुल लेखनाने त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला अमिट असा ठसा उमटविला होता. विशेषतः महात्मा जोतीराव फुले,सावित्रीबाई फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर संशोधनपर साहित्याची निर्मिती त्यांनी केली. या महापुरुषांच्या समग्र वाड्मयाचे त्यांनी संपादन केले. याबाबत जगभरात त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने देखील दिली. मराठी भाषा ही संस्कृत,कन्नड, तेलगु यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीमध्ये प्रमुख समन्वयक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल. त्यांनी निर्माण केलेलं साहित्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
प्रा.हरी नरके यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा समता पुरस्कार तसेच सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अनेक शासकीय आणि देशपातळीवरील त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्था, संघटनांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या निधनाने साहित्य, कला, सांकृतिक, सामाजिक क्षेत्राची तसेच ओबीसी आणि परिवर्तनवादी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नरके कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.