बंगळूरू : एनजीएन न्यूज नेटवर्क
फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलेवरील बलात्कारप्रकरणी माजी खासदार आणि पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यास विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षभरापासून याप्रकरणी न्यायालयीन खटला सुरू होता, अखेर आज बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने प्रज्ज्वल रेवण्णा यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू आणि विद्यमान केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र आहेत.
प्रज्वल रेवण्णा याला चार लैंगिक शोषण व बलात्कार प्रकरणांपैकी एका प्रकरणात दोषी ठरवले. विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी आज रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रेवण्णाने त्याच्या कुटुंबाच्या फार्महाउसमध्ये काम करणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेने मागील वर्षी एप्रिलमध्ये त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली होता. तिने रेवण्णा यांच्यावर २०२१ पासून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आणि या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता रेवण्णावर बलात्कार, धमकी देणे आणि अश्लील फोटो लीक करणे अशा कलमांखाली आरोप करण्यात आले होते. गेल्या वर्षी सेक्स स्कॅण्डलमध्ये समोर आल्यानंतर रेवण्णाचे नाव चर्चेत आले होते. रेवण्णावर ५० हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पन्नास महिलांच्या तक्रारी प्राप्त
हासनच्या स्टेडियमवर शेकडो पेन ड्राइव्ह सापडल्याने समोर आले. या पेन ड्राइव्हमध्ये प्रज्वल रेवण्णांचे दोन हजार आठशे सत्तर व्हिडीओ क्लिप्स आणि फोटो होते. व्हिडीओत अनेक महिलांसोबतचे शरीरसंबंध दिसून येत होते. त्यानंतर, याप्रकरणी पन्नास महिलांच्या तक्रारी आल्या असून, बारा महिलांनी बलात्काराचा आरोप केला आहे. व्हिडीओ समोर येताच रेवण्णा भारताबाहेर निघून गेला होता. ३१ मे रोजी जर्मनीतून भारतात येताच त्याला अटक करण्यात आली. खटल्यात सव्वीस साक्षीदार, शंभर कागदपत्रे आणि अडतीस सुनावण्या झाल्या. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी पीडितेने घातलेली साडी ही ठरली आहे. तपासात त्या साडीवर शुक्राणूंचे (स्पर्मचे) डाग आढळून आले आहेत. जे फॉरेन्सिक तपासणीमध्ये रेवण्णाचे असल्याचे समोर आले.
Comments are closed.