NGN News
Latest Marathi News

भाजपमधील उदंड इच्छुकांमुळे नाशकात महायुती संपुष्टात आल्यात जमा

  • शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीत लढण्याची शक्यता
  • मनसेच्या समावेशामुळे ‘मविआ’ चतुष्कोणी होणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

स्वपक्षातील इच्छुकांची मोठी संख्या आणि भागीदार पक्षांची जागांबाबत असलेली अपेक्षा याचा ताळमेळ बसत नसल्याने भाजप नाशिक महापालीकेपुरती महायुती मोडीत काढण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती पुढे आली आहे. सद्यस्थितीतील हालचाली पाहता भाजप स्वबळावर तर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीत लढण्याची शक्यता गडद झाली आहे. तसे झाल्यास नाशिकमध्ये तिरंगी लढत होणे अपेक्षित आहे.

नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. भाजपला कोणत्याही स्थितीत सत्ता टिकवायची आहे. त्यासाठी प्रारंभी महायुतीची चाचपणी करण्यात आली. मात्र भाजपकडे इच्छुकांची संख्या एक हजाराहून अधिक असल्याने महायुती झाली तर पक्षांतर्गत बंडखोरीची भीती नेतृत्वाला सतावते आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महायुतीसाठी इच्छुक होते, मात्र दोन्ही पक्षांची जागांची मागणी ६० पेक्षा अधिक होत असल्याने भाजप त्यांना सोबत घेण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपकडून योग्य प्रतिसाद न मिळण्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत हातमिळवणी करण्याचे निश्चित केले आहे.

राजकीय हालचाली गतिमान..

निवडणूक पंधरवड्यावर येवून ठेपल्याने नाशिकमधील हालचालींना वेग आला आहे. मंत्री गिरीश महाजन पुढील काही दिवस शहरात तळ ठोकून बसणार असल्याची माहिती आहे. पक्षात बंडखोरी होणार नाही, याकडे त्यांचे बारीक लक्ष राहणार आहे. एक-दोन दिवसांत उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ६० : ४० असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. भाजपमध्ये तूर्तास प्रवेशसोहळे बंद झाल्याने अनेक इच्छुकांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

महाविकास आघाडीही सक्रीय..

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधी महाविकास आघाडीने परस्परांतील चर्चा गतिमान केली आहे. शिवसेना ( उबाठा ), राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एसपी ) आणि राष्ट्रीय कॉंग्रेस यांच्यात बैठकांचा सपाटा सुरु आहे. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात इतरत्र मनसेला सोबत घेण्यास कॉंग्रेसने नकार दिलेला असला तरी नाशिकमध्ये महाविकास आघाडीत मनसे हा चौथा भिडू असणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने मुंबईत कॉंग्रेससोबत युती केली असली तरी नाशिकमध्ये तूर्तास टी शक्यता वाटत नाही.

लहान पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष..

नाशिकमध्ये रामदास आठवले यांचा रिपाइं, आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, समाजवादी पार्टी आदी लहान पक्ष काही अंशी का होईना प्रभाव टिकवून आहेत. यापैकी रिपब्लिकन सेनेने शिवसेनेसोबत आधीच युती जाहीर केली असली तरी त्यांना किती जागा सोडल्या जातील, यावर युतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. हे पक्ष इतर मोठ्या पक्षांच्या वळचणीला जातात की स्वतंत्र चूल मांडतात, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.