मुंबई/एनजीएन नेटवर्क
आगामी मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद अजित पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्तेत सहभागी होतानाच अजित पवार यांना आश्वासन मिळाल्याची माहिती एका मराठी वाहिनीला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेनंतर देखील रखडल्यास अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत करण्याचा सरकारचा मानस आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना-भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचा मुख्यमंत्री झाला पण नऊ मंत्र्यांनी म्हणावी तशी खाती देण्यात आली नव्हती. वर्षभरापासून सेनेच्या उर्वरित इच्छुकांना रोज मंत्रिपदाची शपथ घेतातानाची स्वप्ने पडतात. अजित पवार सत्तेत आल्यानंतर आधीच वैतागलेल्या शिंदे गटाला रोज नवीन धक्के बसत आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असताना ते भाजपकडे आले. पण त्यांना मंत्रिपदासाठी झुलवत ठेवण्यात आले. नंतर आलेल्या अजित पवार गटाला मात्र एका दमात नऊ मलईदार मंत्रिपदं देण्यात आली. एकंदरीत शिंदे गटाची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. आता मंत्रीमंडळ विस्तारात देखील अजित पवर गटाला प्राधान्य मिळत असल्याने पुन्हा शिंदे गटाची नाराजी पुन्हा एकदा वाढत जाण्याची शक्यता आहे.