मुंबई/एनजीएन नेटवर्क
केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असून आज कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अनुकूल वातावरण असल्यामुळे पुढील ४८ तासात मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही धडकण्याची शक्यता आहे.
हवामान विभाग अर्थात आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचे आगमन होऊ शकते. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकलेय. पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी सरकण्याची शक्यता आहे. अनुकूल वातावरण असल्यामुळे मान्सून केरळमधून पुढे सरकलाय. कर्नाटकच्या काही काही भागात हजेरी लावली आहे. त्याशिवाय बंगालच्या उपसागारचा भागही व्यपला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्राचा मध्य भाग आणि गोवा, महाराष्ट्रच्या किनारपट्टीला मान्सून धडकण्याची शक्यता आहे.