NGN News
Latest Marathi News

पराभव गीतेंचा..वादावादी माजी जिल्हाप्रमुखांत; नाशिक शिवसेनेत महाभारत !

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्यभर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे पोवाडे गायले जात असताना आणि दोहो पक्षांत युतीच्या चर्चा झाडत असताना आज नाशिकमध्ये शिवसेना उबाठा आणि मनसेच्या संयुक्त बैठकीत वेगळेच महाभारत घडले. गेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघात मविआ उमेदवार वसंत गीते यांच्या पराभवाचे कवित्व सुरु झाल्यानंतर विनायक पांडे आणि जयंत दिंडे या माजी जिल्हाप्रमुखांत शाब्दिक महाभारत घडले. या वादात पांडे यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याने आधीच गळती लागलेल्या या पक्षाचे निवडणुकीत काय होणार, असा सवाल सामान्य शिवसैनिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

 गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्ष उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचाराचा मुद्दा जयंत दिंडे यांनी उपस्थित केला. तत्कालीन परिस्थितीत ऐरणीवर आलेला एमडी ड्रग्सचा विषय लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्याने गीते यांचा प्रभाव झाल्याचे जयंत दिंडे यांनी भाषणात नमूद केले. या मुद्वयावर विनायक पांडे यांनी आक्षेप घेतला. दिंडे यांचा मुद्दा बरोबर असता तर गीते यांना एवढे मतदान झाले असते का, असा सवाल पांडे यांनी विचारला. आम्ही इतकी वर्षे पक्षात आहोत ते उगाच का, असे म्हणत विनायक पांडे तडकाफडकी बैठक सोडून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे समर्थक देखील बैठक सोडून बाहेर गेले. यावेळी उपस्थित वसंत गीते यांच्यासह इतर नेत्यांनी पांडे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसले नाहीत.

बैठकीनंतर शिवसेना उबाठा संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड तसेच स्वतः जयंत दिंडे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोहोंतील वाद माध्यम प्रतिनिधींसमोर झाल्याने त्याचे चित्रण अल्पकाळात व्हायरल झाले आणि वादाची चर्चा सर्वत्र झाली.

—————-

@ आमच्यात काहीच वाद झाला नाही. आम्ही बालपणापासूनचे मित्र आहोत. निष्कारण गैरसमज पसरवला जात आहे. पांडे का निघून गेले माहिती नाही.  मी प्रत्येक भाषणात काही झालं असेल तर माफी मागतो. कृपया गैरसमज पसरवू नका. 

  • जयंत दिंडे

@ किरकोळ वाद झाला. ड्रग्जचाच मुद्दा आता आम्हाला घ्यायचा आहे, हनी ट्रॅपचा मुद्दा आहे. भाषणात काय बोलले माहिती नाही, काहीच गैरसमज नाही. शहराची काय अवस्था झाली आहे. मुंबईत एकत्र आलो तर हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला. आम्ही शहरासाठी एकत्र आलो आहे निवडणूकीसाठी एकत्र आलो नाही

  • दत्ता गायकवाड

Comments are closed.