सिन्नर/विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील शहा येथे श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी ( दि. 22) मध्यरात्री उघडकीस आला. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलीस ठाण्यात तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ‘त्या’ तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहा येथील भैरवनाथ हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या वैष्णवी नवनाथ जाधव (१६) हिला आत्महत्येस प्रवृत्ती केले म्हणून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वैष्णवी हिने आत्महत्या करण्यापूर्वी संशयित आरोपी वैभव विलास गोराणे (१८), अंकुश शिवाजी धुळसैंदर (१८) व एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा चिठ्ठीमध्ये उल्लेख करून आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे.
संशयित आरोपी वैभव गोराणे याने त्याच्या मित्रांबरोबर मयत वैष्णवी हिच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना दमदाटी करत घरात जाऊन गच्ची पकडून आणि वैष्णवी हिला तुला जगण्याचा अधिकार नाही, तू जीव दे नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो’ अशी धमकी देत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यानंतर वावी पोलिसांनी संशयित वैभव गोराणे आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.