नाशिक/एनजीएन नेटवर्क
गिरणा गौरव प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने उद्या ( दि. ५ ) वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा हॉलमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात शिवसह्याद्री आरोग्य धामचे प्रमुख शिवव्याख्याते शिवरत्न शेट्टे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली.
शहरात अव्याहत शंभर वर्षे वसंत व्याख्यानमालेने ज्ञानदानाचे कार्य केले. न्यायमूर्ती रानडे, जगद्गुरु डॉ. कृतकोटी शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाने रावसाहेब वझे, द.हा. टकले, ना.ह. पाटील, भगवान पानसे यांनी १ मे १९२२ साली या ज्ञान यज्ञाचा आरंभ केला होता. वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांनी शतकोत्सवी वर्ष अतिशय उत्साहात व नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे केले. जगभरातील महाराष्ट्र संस्कृतीचा परिचय असणाऱ्या नामवंतानी यावर्षी या ज्ञान यज्ञात हजेरी लावली. त्यानिमित्ताने गिरणा गौरव प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा शिवसह्याद्री आरोग्य धामचे प्रमुख शिवव्याख्याते शिवरत्न शेट्टे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक तुमच्या दारी या चळवळीचे प्रणेते वसंत खैरनार हे भूषवणार असून या कृतज्ञता सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येत्या ५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा हॉलमध्ये आयोजित होणाऱ्या या कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार कार्याध्यक्ष रवींद्र मांलुजकर,उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड डॉ. अश्विनीताई बोरस्ते, या उपक्रमाचे संयोजक प्राचार्य प्रशांत पाटील, प्रा.शंकर बोराडे यांनी केले आहे.