NGN News
Latest Marathi News

Gen Z मराठी चित्रपट ‘मॅगझिन’ २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शहरात वाढलेल्या, सिनेमावर प्रेम करणाऱ्या एका तरुणाची गोष्ट सांगणारा ‘मॅगझिन’ हा Gen Z च्या नजरेतून गाव, ओळख आणि ‘घर’ या संकल्पनेकडे पाहणारा चित्रपट आहे. महाराष्ट्रातील आपल्या मूळ गावी परतल्यावर त्याच्या दृष्टिकोनात होणारा बदल हा चित्रपटाचा गाभा आहे.

कोणत्याही मोठ्या स्टुडिओच्या पाठबळाशिवाय साकारलेला ‘मॅगझिन’ हा चित्रपट स्वतःच्या कथेवर विश्वास ठेवून स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीचं उदाहरण आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शुभम संजय शेवडे आणि सहनिर्मात्या अपर्णा कुलकर्णी यांनी आपापल्या नोकऱ्या सांभाळत या चित्रपटाच्या निर्मितीचं आव्हान स्वीकारलं.

नाशिकशी नातं असलेले शुभम अ‍ॅडटेक क्षेत्रात कार्यरत आहेत, तर अपर्णा सरकारी क्षेत्रात बँकेत मॅनेजर आहेत. अपर्णा यांचं मूळ गाव असलेल्या महाराष्ट्रातील दत्तवाडने या चित्रपटाला केवळ प्रेरणाच दिली नाही, तर चित्रपटाचं शूटिंगही याच गावात झालं. दत्तवाडचा सुंदर निसर्ग आणि ग्रामीण महाराष्ट्राचं अस्सल रूप ‘मॅगझिन’मध्ये पाहायला मिळतं. गावातलं वातावरण आणि निसर्गाची सुंदर दृश्यं मोठ्या पडद्यावर एक वेगळाच अनुभव देतात.

या दृश्यविश्वाला अधिक भव्यता आणि भावनिक खोली देण्याचं काम उत्तराखंडचे संगीतकार विलक्षण कंडवाल यांनी तयार केलेला ओरिजिनल बॅकग्राउंड स्कोअर करतो. चित्रपटातील प्रसंग आणि व्यक्तिरेखांचं भावविश्व संगीताच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे उलगडतं. हे संगीत चित्रपटाच्या दृश्यांपुरतं मर्यादित न राहता स्वतंत्रपणेही अनुभवता यावं, यासाठी ‘मॅगझिन’चा ओरिजिनल साउंडट्रॅक प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या संगीताचं आणखी एक आकर्षण म्हणजे संगीतकार सलील कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे यांचं अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणं. त्यांच्या सहयोगातून साकारलेलं ‘चल जाऊ पुन्हा परतून घराला रे’ हे प्रमोशनल गाणं प्रदर्शित झालं असून, शुभंकर कुलकर्णी यांनी ते गायलं आहे.

‘मॅगझिन’चा समावेश २०२६ साठी फिप्रेस्सी-इंडियाच्या समकालीन भारतीय चित्रपटांच्या यादीत करण्यात आला आहे. या यादीत ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचाही समावेश होता, ज्याची पुढे ९९व्या अकॅडमी अवॉर्ड्ससाठी भारताकडून अधिकृत निवड झाली.

या चित्रपटातून तीन नव्या Gen Z चेहऱ्यांना मोठ्या पडद्यावर संधी मिळत असून, त्यांच्यासोबत मराठी मनोरंजनविश्वातील तीन अनुभवी कलाकारही दिसणार आहेत. नव्या पिढीची ऊर्जा आणि अनुभवी कलाकारांची ताकद यांचा संगम असलेला ‘मॅगझिन’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाइन प्रदर्शित झाला असून, चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी केवळ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची टीम

लेखन-दिग्दर्शन: शुभम संजय शेवडे
पटकथा आणि संवाद: शुभम शेवडे, प्रतीक हंडोरे
निर्माते: शुभम शेवडे, अपर्णा कुलकर्णी, अमृत कुलकर्णी
कार्यकारी निर्माते: डॉ. मोहन आगाशे, भालचंद्र कुलकर्णी
कलाकार: राघव वर्तक, डॉ. निलेश माने, सुदर्शन देशमुख, वेदिका कुलकर्णी
ज्येष्ठ कलाकार: अतुल परचुरे, शिवाजी साटम, किशोर कदम
सिनेमॅटोग्राफी: दत्ताराज कुवळेकर
संगीत: सलील कुलकर्णी
गीत: संदीप खरे
गायक: शुभंकर कुलकर्णी
ओरिजिनल बॅकग्राउंड स्कोअर: विलक्षण कंडवाल
साउंड डिझाइन: निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर
व्हीएफएक्स: शुभंकर सौंदणकर
डीआय कलरिस्ट: भूषण सहस्रबुद्धे
कॅमेरा टीम: शुभम मुसाळे, अथर्व चव्हाण
मेकअप: अविनाश मोडक
लोकेशन साउंड: अक्षय मोरे
व्हिज्युअल प्रमोशन डिझायनर: विशाल बाटे
लाइन प्रोड्युसर: राम कळगी
मीडिया कन्सल्टंट: अमेय आंबेरकर
वितरक: सनशाइन स्टुडिओ

Comments are closed.