NGN News
Latest Marathi News

कामदा एकादशीला भव्य गरुड रथयात्रा; नियोजन बैठक उत्साहात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : रामनवमीनंतर दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गरुड रथोत्सवाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक शनिवारी ( दि. २८ ) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त, पुजारी परिवार, उत्तर व दक्षिण गोदावरी तीरावरील पारंपरिक कुटुंबीय, तसेच नाशिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गरुड रथोत्सवाची संपूर्ण जबाबदारी परंपरेनुसार श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळ (तालीम), नाशिक यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. राम मंदिर संस्थानाकडून विधिवत रथ ताब्यात घेऊन प्रभू श्रीरामांच्या चरण पादुका आणि देवप्रतिमा रथामध्ये विराजमान केल्या जातात. त्यानंतर पंचवटी व नाशिक नगरीतील उत्तर व दक्षिण तीर परिसरात प्रभू श्रीरामांची ग्रामभेट रथातून आयोजित केली जाते. या सोहळ्यात लाखो भाविक मनोभावे सहभागी होऊन प्रभूंचे दर्शन घेतात. ग्रामप्रदक्षिणेची जबाबदारी मंडळातील बलोपासक पिढ्यान्‌पिढ्या परंपरेने पार पाडत आहेत.


संस्थेची परंपरा व कार्यदृष्टी
कोणत्याही संस्थेची प्रगती ही सातत्य, एकजूट आणि सकारात्मक दृष्टीकोनावर अवलंबून असते. मागील काही वर्षांत विविध आव्हाने समोर आली; मात्र सर्वांच्या संयम, नियोजन आणि परस्पर सहकार्यामुळे संस्थेचे कार्य अखंडपणे सुरू राहिले. कोविडनंतर तरुण पिढी नव्या उमेदीने आणि जिद्दीने पुढे आली असून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना व जबाबदारीची जाणीव त्यांनी प्रभावीपणे दाखवून दिली आहे.

संघटनात्मक बळकटीसाठी नियमित बैठका, मार्गदर्शन सत्रे आणि विविध उपक्रम राबविण्यात आले. परंपरा जपत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नव्या तरुणांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे व्यायामशाळेची परंपरा अधिक सक्षम आणि प्रभावीपणे पुढे नेली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर
जुन्या कार्यकारिणीच्या संमतीने पुढील नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे :
अध्यक्ष: श्री. पवन दीक्षित
उपाध्यक्ष: श्री. अमोल चंद्रात्रे
सचिव: श्री. श्रीकृष्ण चंद्रात्रे
सहसचिव: श्री. कमलेश शौचे
कोषाध्यक्ष: श्री. चैतन्य दीक्षित
सदस्य:
श्री. रविंद्र दीक्षित
श्री. शरद दीक्षित
श्री. शरद गर्गे
श्री. नंदन दीक्षित
श्री. जयंत खाडिलकर
श्री. प्रणव बेळे
समन्वयक: श्री. विनायक चंद्रात्रे
अनुभवी सदस्यांचे मार्गदर्शन आणि तरुण कार्यकर्त्यांची ऊर्जा यांचा समन्वय साधत ही कार्यकारिणी संस्थेचे कार्य अधिक व्यापक, संघटित व प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त करते.


रथयात्रा दिनांक व मार्ग
रथयात्रा दिनांक: २९ मार्च २०२६, रविवार (कामदा एकादशी)
आरंभ व समारोप: श्री काळाराम मंदिर, नाशिक
गरुड रथ मार्ग:
श्री काळाराम मंदिर → चरण पादुका → लक्ष्मण झुला → जुना आडगाव नाका → काट्या मारुती पोलीस चौकी → गणेशवाडी → आयुर्वेदिक हॉस्पिटल → गौरी पटांगण → रोकडोबा तालीम → दिल्ली दरवाजा → नेहरू चौक → धुमाळ पॉईंट → मेन रोड → बोहरपट्टी → सराफ बाजार → कापड बाजार → बालाजी मंदिर → रामसेतु पुलाच्या पश्चिम बाजूने कपूरथळा → म्हसोबा पटांगण → सद्यावर्ते देवी मंदिर → कपालेश्वर पटांगण → मालवीय चौक → शनी चौक → श्री काळाराम मंदिर

गरुड रथोत्सव परंपरागत थांबे
➡ नागचौक
➡ चरण पादुका
➡ गणेशवाडी तालीम
➡ रोकडोबा – मधली होळी तालीम
➡ गुलालवाडी व्यायामशाळा
➡ ओकाची तालीम
➡ मेन रोड – गणपती मंदिर
➡ सोन्या मारुती – सराफ बाजार
➡ मुरलीधर मंदिर – बालाजी मंदिर
➡ कपूरथळा
➡ सरदार चौक – देवी मंदिर
➡ अहिल्याराम व्यायामशाळा
➡ अहिल्याराम मंदिर
➡ रामतीर्थ
➡ शनी मंदिर
श्री काळाराम मंदिर तसेच श्रद्धांजली स्थळांवर कै. बंडूजी दीक्षित, कै. दिगंबरजी दीक्षित व कै. गणूजी सावरकर यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यात येईल.

परवानगी, सुरक्षा व स्वयंशिस्त
रथयात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित प्रशासन, पोलीस विभाग व महानगरपालिका यांची आवश्यक परवानगी घेण्यात येणार आहे. रथमार्गावर स्वयंसेवकांची नियुक्ती, नियंत्रण व्यवस्था, प्राथमिक उपचार पेटी व आपत्कालीन तयारी यांची विशेष काळजी घेण्यात येईल. भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शन मिळावे, यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
सर्व बलोपासक व भाविकांनी शिस्त, संयम आणि परंपरेचा मान राखून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रथमार्गावरील कामांबाबत प्रशासनास निवेदन
रथमार्गावरील काही ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम व दुरुस्ती कामांमुळे संभाव्य अडचणी लक्षात घेता संबंधित पोलीस ठाणे, स्मार्ट सिटी विभाग, महानगरपालिका व इतर संबंधित यंत्रणांना निवेदन देण्यात येणार आहे.
विशेषतः पुढील ठिकाणी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे :
• राम मंदिर परिसरातील भिंतीचे सुरू असलेले काम
• कमानी व पिलर रोड परिसरातील बांधकाम
• गणेशवाडी आयुर्वेदिक कॉलेजजवळील स्पीडब्रेकर व पाइपलाइन काम
• गंगेच्या दिशेने उतारावरील खोदकाम
• सराफ बाजार परिसरातील खराब रस्ता
• कपालेश्वर परिसरातील सुरू असलेले काम
ही कामे तात्पुरती सुरक्षित करण्यात यावीत व रथमार्ग सुरळीत ठेवण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
गरुड रथोत्सव हा नाशिकच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळ, नाशिक

Comments are closed.