NGN News
Latest Marathi News

नाशिक महापालिका ‘स्थायी’ सभापतीपदाची माळ सानप यांच्या गळ्यात

  • उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेतल्याची बक्षिसी
  • बुधवारी होणार अधिकृत शिक्कामोर्तब

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असतानाच भाजपचा उमेदवार कोण, याचा सस्पेन्स अखेर सोमवारी दुपारी संपला. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्याव्या लागलेल्या मच्छिंद्र सानप यांचे या पदासाठी जाहीर करण्यत आले आहे. सभापती पदाबाबत कुंभ मंत्री गिरीश महाजन हे अंतिम निर्णय घेणार हे निश्चित असल्याने ते कोणत्या नावाला पसंती देतात, याकडे लक्ष लागून राहिले होते. स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक 25 फेब्रुवारीला होणार आहे. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्याव्या लागलेल्या मच्छिंद्र सानप यांचे या पदासाठी अग्रक्रम देण्यात आल्याचे यानिमित्त स्पष्ट झाले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस असताना पक्षाकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली होती. स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी अर्थात 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. समितीत भाजपचे सर्वाधिक ९ सदस्य असल्याने सभापतिपद याच पक्षाकडे राहणार हे स्पष्ट आहे. त्यानंतर सर्वाधिक ४ सदस्य असलेल्या शिवसेना तसेच एकमेव सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला पाठींबा आहे. विरोधात केवळ शिवसेना (उबाठा ) चे 2 सदस्य आहेत.

भाजपकडून ही नावे होती चर्चेत..

महापालिकेच्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू होती. पक्षाचे प्रभारी तथा कुंभ मंत्री गिरीश महाजन हे याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट होते. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, डॉ. दिपाली कुलकर्णी आणि माधुरी बोलकर यांची नावे त्यासाठी सर्वाधिक चर्चेत होती. उपमहापौर निवडणुकीवेळी भाजपने ऐनवेळी शिवसेनेसह युती केल्याने सानप यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली होती. त्याचा परतावा म्हणून आता त्यांना स्थायी समिती सभापतीपदाची संधी दिली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा वास्तवात प्रत्ययास आली. याशिवाय महापौर पदाच्या शर्यतीत शेवटपर्यंत राहिलेल्या दीपाली कुलकर्णी आणि माधुरी बोलकर यांनीही सभापतीपदासाठी लॉबिंग केल्याची माहिती आहे. मात्र अखेर ही नावे बाजूला पडून मच्छिंद्र सानप यांच्या नावावर प्रदेश भाजपने शिक्कामोर्तब केले.

स्थायी समिती बलाबल असे..

भाजप : ९  

शिवसेना : ४

राष्ट्रवादी काँग्रेस : १

शिवसेना (उबाठा )  : २

Comments are closed.