नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची पावसाची रिपरिप सुरु असून अजूनही दमदार पावसानी हजेरी लावलेली नाही. तथापि, त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे धरणात 69 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी 539 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरू आहे. अधून मधून मुसळधार सरी कोसळत असल्याने इगतपुरी तालुक्यातील धरणे भरली आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गंगापूर धरणातून शुक्रवारी दुपारी 539 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दुसरीकडे भावली धरण 100 टक्के भरले असून त्यातून 701 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा धरण 78 टक्के भरल्याने त्यातून 6569 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.