चांदवड/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून सुरळीत सुरू होणार असल्याची घोषणा बुधवारी झाल्यानंतरही चांदवड बाजार समितीत शेतकऱ्यांनी मात्र लिलावाला विरोध केला. नाफेडचे अधिकारी हजर नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होवून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना हजारो वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
प्राप्त माहितीनुसार, चांदवड बाजार समितीत आज सकाळी कांदा लिलाव सुरू झाला. कांद्याच्या 150 गाड्या लिलावासाठी बाजार समितीत दाखल झाल्या. तथापि, नाफेडचे अधिकारी हजर नसल्याने शेतकरी संतापले होते. नाफेड मार्फत होणारी खरेदी थेट बाजारात करण्याची मागणी लावून धरत शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. बाजार समिती आवारात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी नाफेड विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे बाजार समिती आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. भर पावसात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. त्यानंतर या शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून थेट मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
लासलगावी लिलाव बंद पाडले
दरम्यान, लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते. लिलावात 1700 ते 1800 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याचे लिलाव बंद पाडत, नाफेडने प्रत्यक्षात लिलाव करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकर्यांनी नाफेडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाफेड आहे कुठे? असा सवालही शेतकऱ्यांनी यावेळी केला.