नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
‘टाईम्स नाऊ -ईटीजी’ यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वे केला आहे. आता निवडणुका झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांबाबतही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मागील निवडणुकीत 48 जागांपैकी भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. या वेळीही भाजपला 22-24 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर एनडीए आघाडीला 32-36 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळत नसल्याचा अंदाज टाइम्स नाऊ-ईजीटीने सर्वेमध्ये व्यक्त केला आहे. सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 68-70 जागांवर विजय मिळू शकतो. तर, एनडीए आघाडीला 69-73 जागा मिळू शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 62 जागांवर विजय मिळाला होता. तर, एनडीए आघाडीला 64 जागांवर विजय मिळाला होता.
तर, राजस्थान, हिमाचल, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड सारख्या राज्यांमध्ये भाजपला कौल मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लोकसभेपूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. राजस्थानमध्ये भाजपला 25 पैकी 20 ते 22 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेशात भाजपला 22-24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेसला 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्येही भाजपचे वर्चस्व राहण्याचा अंदाज आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला 6 ते 8 जागांवर विजय मिळू शकतो. तर, काँग्रेसला 3 ते 5 जागांवर विजयाचे समाधान मानावे लागू शकते.
बिहारमध्येही भाजपच्या एनडीएला लोकसभेच्या 40 पैकी 22-24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने महाआघाडी केली आहे. असे असले तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचे वर्चस्व कायम राहणार आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नितीशसोबत राहूनही भाजपने 17 जागांवर विजय मिळाला होता. नितीश यांच्या जेडीयूला 16 जागा मिळाल्या होत्या. एनडीएला 40 पैकी 39 जागा मिळाल्या होत्या. झारखंडमध्येही भाजपला 14 पैकी 10-12 जागा मिळण्याची शक्यता आहे. गुजरात, उत्तराखंड आणि गोव्यात भाजप सर्व विरोधकांचा धुव्वा उडवताना दिसत आहे. सर्वेनुसार, गुजरातमधील सर्व 26 जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तराखंडच्या 5 आणि गोव्याच्या दोन्ही जागाही भाजपच्या गोटात येण्याची शक्यता आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश दिल्ली, हिमाचल, लडाख आणि ईशान्येकडील 9 जागांवर भाजपचे वर्चस्व राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हरयाणा, आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला आघाडी मिळण्याची शक्यता आहे.