नाशिक/एनजीएन नेटवर्क
स्वतःला व्यक्त करता यावे ही बाब जेव्हा पुढे येते तेव्हा समाजाचे परिवर्तन होताना दिसून येते. त्यासाठी मुक्त चिंतनाची खरी गरज आहे, असे प्रतिपादन सपकाळ नॉलेज हबचे संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र सपकाळ यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच व नाशिक जिल्हा महिला बचत गट सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित आठवणीतला पाऊस या परिसंवादा प्रसंगी ते बोलत होते. डॉ. सपकाळ पुढे म्हणाले की समाजामध्ये महिलांचे विशेष योगदान आहे .त्यामुळे मिळून साऱ्याजणी हा परिपाठ समाजकार्याच्या हितासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. महिलांमध्ये सामाजिक काम करताना किंवा बचत गटाचे काम करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये, कारण प्रत्येक महिला ही डोळ्यासमोर आयुष्यभर अंधार घेऊन जगणाऱ्याच्या आयुष्याच्या वाटा तिमिरातून तेजाकडे नेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे मतभेद बाजूला करून गरीब श्रीमंत असा भेद न करता विकासाच्या वाटेवर जाताना प्रत्येक महिलेला सोबत घेतल्याशिवाय आपण करत असलेल्या कार्याला महत्त्व प्राप्त होणार नाही असेही डॉ. सपकाळ म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. अश्विनीताई बोरस्ते पुढे म्हणाल्या की समाज संघटन आणि महिलांचा विकास या बाजू घेऊन बचत गट आणि गिरजा महिला मंच हे विविध सामाजिक उपक्रम घेत सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रांना हात घालत महिलांना एक वेगळे व्यासपीठ तयार करून देत आहे. त्यामुळे गिरजा महिला मंच संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा आयाम प्राप्त करणार असल्याचेही डॉ. बोरस्ते यांनी यावेळी सांगितले. गिरजा महिला मंचच्या माध्यमातून महिलांना बचत गटाची, साहित्याची, सामाजिकतेची आवड निर्माण व्हावी यासाठी गिरजा महिला मंचची स्थापना करण्यात आली .गिरजा महिला परिवाराने नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत सटाणा, येवला, निफाड, नाशिक आदी ठिकाणी विविध कार्यक्रम करून महिलांचा विश्वास संपादन केला आहे. महिलांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा आत्मविश्वासही डॉ. बोरस्ते यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर तालुका तहसीलदार श्रीमती संचेती, सपकाळ नॉलेज हबच्या मॅनेजिंग डायरेक्टर कल्याणी सपकाळ, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार,गिरजा महिला मंच जिल्हाध्यक्ष नीलिमाताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भाग्यश्री चौधरी ,सचिव भारती निकम, शहर उपाध्यक्ष अलका दराडे, आदी मान्यवर होते.बचत गटाच्या संचालक मंडळ व गिरजा महिला मंचच्या पदाधिकारी व सदस्या बहुसंख्येने उपस्थित होत्या .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभाताई म्हस्के यांनी केले, तर सूत्रसंचालन सीमा वाजे यांनी केले. यावेळी आभार माधुरी भावनाथ यांनी मानले.