NGN News
Latest Marathi News

दोन महिन्यात खड्ड्यांचे चार बळी; प्रशासन निषेधार्थ शेकडो नागरिक रस्त्यावर

आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी शाळा या लिंकरोडबाबत प्रशासकीय शैथिल्य

मेरी-म्हसरूळ भागात आंदोलन; प्रशासनाचा निषेध; तीव्र आंदोलनाचा इशारा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात मोठा असंतोष आहे. शुक्रवारी याच मुद्द्यावर मेरी-म्हसरूळ भागातील शेकडो नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी प्रशासनाच्या धोरणाचा जाहीर निषेध केला. आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी शाळा या लिंकरोडवर खड्ड्यांमुळे झालेल्या विविध अपघातांनी गेल्या दोन महिन्यात तब्बल चार बळी घेतल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याप्रसंगी प्रशासनाचा निषेध करण्यात येवून तत्काळ उपाययोजना ण झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

या प्रश्नावर पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देवूनही योग्य कार्यवाही होत नाही. रिंगरोडचे स्वरूप असलेल्या या रस्त्याची रुंदी ९ मीटर देखील नाही. शिवाय, १८ फुट रुंदीच्या या रस्त्याच्या साईडपट्ट्या खोलवर असल्याने त्याचा वाहतुकीसाठी अजिबात वापर होत नसल्याने रस्त्याच्या अरुंदपणात भर पडली आहे. या रस्त्यावरून दरोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. याची प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून देण्यात आली. मात्र, तरीही प्रशासनाचे डोळे उघडले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आज झालेल्या आंदोलनात महिला, युवक, नागरिक यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले. याप्रसंगी राजू देसले, प्रसाद सानप, सुनील निरगुडे, रवि गायकवाड, विशाल कदम, रवि कापसे यांसह नागरिक उपस्थित होते.

मोठ्या वर्दळीचा रस्ता ,,

आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी शाळा हा लिंकरोड अतिशय मोठ्या वर्दळीचा आहे. या भागात अनेक महाविद्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने लोकांची आणि परिणामी वाहनांची मोठी वर्दळ असते. सदर रस्त्यावरून गुजरातला जाणारा तसेच मुंबई-आग्रा महामार्ग इथली वाहतूक होत असते, मात्र अरुंद स्वरूपाच्या या रस्त्यावरील खड्डे प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नाशिकमधून जाणाऱ्या उड्डाणपुलावर चढायला सुलभ मार्ग म्हणूनही हा रस्ता वाहनधारकांची पसंती ठरतो. स्वाभाविकच, या मार्गावरून दैनंदिन धावणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

——-

@ नाशिकमध्ये वाहनसंख्या प्रचंड वाढली असताना पायाभूत सुविधा विकसित करण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अशातच गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी शहरवासीय हैराण आहेत. आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी शाळा लिंकरोड अरुंद असला तरी येथून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची सरासरी संख्या तीस हजारांच्या घरात आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देवूनही कार्यवाही झाली नाही. आज सगळ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आली आम्ही रस्त्यावर आलो. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

  • प्रसाद सानप, उपाध्यक्ष, मनसे नाशिक

Comments are closed.