नाशिकरोड पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या होते तयारीत; तिघांचा शोध जारी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना शोधून त्यांना कोठडीची हवा खायला लावण्यास नाशिकरोड पोलिसांनी भाग पडले आहे. या चौकडीकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. विहितगावच्या बागुल नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री हा थरार प्रत्ययास आला.
प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शोध पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना वालदेवी नदी पुलाजवळ सात जनाचे टोळके आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. विचारपूस करण्याच्या हेतूने पोलिसांनी वाहन थांबवले असता टोळक्याने झाडाझुडपाचा आधार घेत फरार होण्यात यश मिळवले. मात्र पोलीस ठाण्याला याबाबत सूचना गेल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त कुमक दाखल झाली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम राबवून चौघा सराईत चोरांना ताब्यात घेण्यात आले. तेजस अनिल गांगुर्डे, रेहमान जाफर शेख, समीर जाकीर शेख आणि गौरव आनंद बाविस्कर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे हस्तगत करण्यात आली. चौकशीअंती रस्त्यावरील वाहनांची लुट करण्याचा इरादा असल्याची कबुली त्यांनी दिली. या टोळीतील तिघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Comments are closed.