नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे आज निधन झाले. दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. मंगळवारी, सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. बिंदेश्वर पाठक यांचे देशातील स्वच्छता मोहिमेत मोठे योगदान राहिले आहे. 1970 च्या दशकात त्यांनी सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना केली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
सुलभ इंटरनॅशनलची देशभरात सुमारे 8500 शौचालये आणि स्नानगृहे आहेत. सुलभ इंटरनॅशनलचे टॉयलेट वापरण्यासाठी 5 रुपये आणि आंघोळीसाठी 10 रुपये आकारले जातात. तर अनेक ठिकाणी ते सामुदायिक वापरासाठीही मोफत ठेवण्यात आले आहेत.
महात्मा गांधी प्रेरणास्थानी
डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी महात्मा गांधींना आपले प्रेरणास्थान मानले. गेल्या 50 वर्षांत त्यांनी हाताने मैला साफ करणाऱ्या सफाई कामगारांच्या मानवी हक्कांसाठी अथक परिश्रम केले. हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांचे पुनर्वसन करणे, कौशल्य विकासाद्वारे पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे, आदी त्यांच्या कार्याचे उद्दिष्ट होते. डॉ.बिंदेश्वर पाठक यांनी शांतता, सहिष्णुता आणि सशक्तीकरण यांना प्रोत्साहन देण्याचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.