NGN News
Latest Marathi News

बनावट शालार्थ आयडी घोटाळा : माजी शिक्षण उपसंचालकास अटक

  • शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे सिध्द

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आधी अटक केलेय संशायीतांकडील कागदपत्रे आणि तत्सम पुराव्यांवरून उपासनी यांनी शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवून देणाऱ्या या प्रकरणातील रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. त्यानुसार, बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाला चुना लावण्यात आला. गंभीर बाब म्हणजे पात्रता नसलेल्या शिक्षकांना वेतन प्राप्त झाले. याप्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई आणि वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करणात आला आहे. काही संस्थाचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने धुळे येथील मनोज पाटील आणि जळगावमधील निलेश पाटील यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून काही कागदपत्रे जप्त केली होती. त्यामधील माहितीच्या आधारे नितीन उपासनी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

शालार्थ आयडी म्हणजे काय ?

शालार्थ आयडी देताना काही निकष आहेत. ज्यामध्ये एखाद्या शिक्षकाला शिक्षक सेवक म्हणून विशिष्ट कालावधीसाठी कार्यरत राहावे लागते. त्यानंतरच ती व्यक्ती शालार्थ आयडीसाठी पात्र ठरते. संबंधित आयडी प्राप्त झाल्यानंतर शिक्षक म्हणून व्यक्ती शासन वेतन प्राप्त करू शकते. मात्र, बनावट शालार्थ आयडी देत कोट्यवधींचा घोटाळा समोर आल्याने हे प्रकरण राज्यभर गाजते आहे.

कारकिर्दीला वादग्रस्त किनार..

दरम्यान, नितीन उपासनी यांची प्रारंभीपासून वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे. नाशिक महापालिकेचे शिक्षणाधिकारी असताना त्यांच्या कारकिर्दीतील शिक्षक भारती घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्यावेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी काहूर माजवले होते. त्यानंतर आता बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.