नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
फोर्ब्सने नुकतीच ‘ग्लोबल 2000’ यादी जाहीर झाली आहे. या यादीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने भरारी घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आठ स्थानांनी भरारी घेतली असून 45 व्या स्थानांवर स्थिरावली आहे. कोणत्याही भारतीय कंपनीच्या तुलनेत हे सर्वोत्तम स्थान होते. फोर्ब्सने 2023 साठी जगातील टॉप 2000 कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील स्थान निश्चित करताना विक्री, नफा, संपत्ती आणि बाजार मूल्यांकन याचा आधार घेण्यात आला आहे.
वृत्तानुसार, अमेरिकेतील सर्वात मोठी बँक जे पी मॉर्गन 2011 नंतर सगळ्यात पहिल्यांदा या यादीत अव्वलस्थानी आहे. बँकेची एकूण संपत्ती 3700 अब्ज डॉलर इतकी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही 109.43 अब्ज डॉलरची विक्री आणि 8.3 अब्ज अमेरिकन डॉलरच्या नफ्यासह 45 वे स्थान मिळाले. टेलिकॉम ते खनिज तेल, रिटेल आदी विविध क्षेत्रात रिलायन्सचा व्यवसाय आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने ही जर्मनीची कंपनी बीएमडब्लू, स्विर्त्झर्लंडची नेस्ले, चीनची अलिबाबा, अमेरिकेची प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल आणि जपानची सोनी या कंपन्यांना मागे सारले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया 2022 च्या क्रमवारीत 105 व्या स्थानावरून 77 व्या स्थानावर पोहोचली आहे. HDFC बँक 128 व्या स्थानावर आहे (2022 मध्ये 153) आणि ICICI बँक 163 (2022 मध्ये 204) आहे.
या यादीतील इतर भारतीय कंपन्यांमध्ये सार्वजनिक कंपनी ओएनजीसी 226 आणि HDFC 232 यांचा समावेश आहे. भारतीय विमा महामंडळ (LIC) ने 363 व्या क्रमांकावर आहे. TCS कंपनीचे स्थान मागील वर्षी 384 होते, यंदा 387 व्या क्रमांकावर घसरला आहे. अॅक्सिस बँक (423), एनटीपीसी (433), लार्सन अँड टुब्रो (449), भारती एअरटेल (478), कोटक महिंद्रा बँक (502), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (540), इन्फोसिस (554), बँक ऑफ बडोदा (586), कोल इंडिया (591), टाटा स्टील (592), हिंदाल्को (660) आणि वेदांत (687) या यादीतील इतर भारतीय कंपन्या आहेत.
फोर्ब्सच्या यादीत अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचा समावेश आहे. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेस (1062 क्रमांक), अदानी पॉवर (1488 क्रमांक) आणि अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकोनॉमिक झोन (1598 क्रमांक) या यादीत समावेश आहे.