पक्षप्रेमींमध्ये उत्साह , आनंदाचे वातावरण
लासलगाव : राकेश बोरा
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव धरण परिसरात सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता तब्बल शंभरच्या आसपास ग्रेटर फ्लेमिंगो (रोहीत)पक्षांचा थवा आढळून आला. हिवाळा सुरू होण्यापूर्वीच या दुर्मिळ विलोभनीय पक्ष्यांचे आगमन झाल्याने परिसरातील पक्षीप्रेमी व पर्यावरणप्रेमींत समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.
सामान्यतः ग्रेटर फ्लेमिंगो हिवाळ्याच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर अभयारण्यात शेकडो मैलांचा प्रवास करून दिसून येतात. मात्र खडक माळेगाव येथे प्रथमच या पक्ष्यांचा थवा आढळून आल्याने स्थानिकांसाठी हा एक आगळावेगळा अनुभव ठरला आहे.
गुलाबी रंगासाठी ओळखले जाणारे हे पक्षी त्यांच्या आहारातील कॅरोटेनॉइड्समुळे वैशिष्ट्यपूर्ण भासतात. 1.5 मीटर उंची, एक ते चार किलो वजन असलेले फ्लेमिंगो पक्षी 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकतात. त्यांच्या अनोख्या उलट्या चोचीमुळे ते गाळातून खाद्य वेगळे करून खातात. खेकडे, शिंपले, शेवाळ, कोळंबी आणि मासे हा त्यांचा प्रमुख आहार आहे.
फ्लेमिंगो प्रामुख्याने पाणथळ जागेत थवे करून वास्तव्य करतात. नर व मादी दोघेही अंड्याचे संगोपन करतात ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सवय आहे. त्यांचा प्रजनन काळ सप्टेंबर-ऑक्टोबर तसेच मार्च-एप्रिल असा असतो.
भारतामध्ये कच्छ, राजस्थान, तामिळनाडू याठिकाणी हे पक्षी मोठ्या प्रमाणावर दिसतात. मात्र खडक माळेगाव धरणात हिवाळ्याच्या सुरुवातीपूर्वीच या गुलाबी पाहुण्यांचे स्वागत झाल्याने स्थानिक व पक्षप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे.
Comments are closed.