मुंबई/एनजीएन नेटवर्क
ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने आज पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल शासनाने रतन टाटा यांचा गौरव केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते रतन टाटांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रतन टाटा यांच्या मुंबईतील कुलाबा येथील निवासस्थानी हा छोटेखानी सोहळा पार पडला. 25 लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. टाटा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रतन टाटा यांच्याशी उद्योग आणि राज्यातील विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे