NGN News
Latest Marathi News

नानासाहेब पाटील यांना प्रथम ‘समर्थ रत्न सहकारिता पुरस्कार’ प्रदान

  • सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री समर्थ सहकारी बँकेच्या वतीने गौरव

लासलगाव: एनजीएन न्यूज नेटवर्क

सहकार आणि बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांना नाशिक येथील श्री समर्थ सहकारी बँकेच्या वतीने दिला जाणारा पहिला ‘समर्थ रत्न सहकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नाशिक येथील शंकराचार्य न्यास, डॉ. कुर्तकोटी हॉल येथे एका विशेष सोहळ्यात हा सन्मान सोहळा पार पडला.

ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत डॉ. उदय निरगुडकर, श्री समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष राधाकृष्ण नाईकवाडे आणि व्हाईस चेअरमन मनोज बाग यांच्या हस्ते नानासाहेब पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने श्री समर्थ सहकारी बँकेने यंदापासून हा पुरस्कार सुरू केला असून, त्याचे पहिले मानकरी नानासाहेब पाटील ठरले आहेत.

नानासाहेब पाटील यांनी लासलगाव विभाग सहकारी खरेदी-विक्री संघ, नाफेड आणि लासलगाव बाजार समिती यांसारख्या विविध महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये काम केले आहे. आपल्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी लोकहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यांच्या याच अभ्यासू वृत्तीचा आणि कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.

या सोहळ्याप्रसंगी डॉ. उदय निरगुडकर यांनी “जागतिक अस्थिरता व विकसित भारत – आव्हाने व संधी” या विषयावर व्याख्यान दिले.  या कार्यक्रमाला लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेचे संचालक मंडळ, लासलगाव खरेदी-विक्री संघाचे संचालक आणि लासलगाव परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.