पुणे/एनजीएन नेटवर्क
चांगल्या मैत्रीनंतरही विवाहास नकार दिल्याने आरोपी राहुल हांडोरे याने दर्शना पवारची जीवनयात्रा संपवली. त्या दिवशी झालेल्या वादावादीनंतर रागाच्या भरात दर्शनावर सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वार केले. त्या वेळी कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची कबुली राहुल हांडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली. मात्र, माझा दर्शनाला मारण्याचा हेतू नव्हता. माझ्याकडून अनावधानाने हे कृत्य घडल्याचे राहुलने चौकशी दरम्यान सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राहुलच्या जबाबानुसार, एमपीएससीच्या परीक्षेची तयारी आम्ही दोघे एकत्र करत होतो. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मी मदत केली. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने विवाहास नकार दिला. राग आल्याने मी तिला संपवायचे ठरविले, असे आरोपी राहुल हंडोरने चौकशीत सांगितले.एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने २१ जून रोजी आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक केली. दर्शनाचा खून केल्यानंतर तो परराज्यात पसार झाला होता. दर्शना आणि राहुल राजगड येथे गेले होते.
गडावरुन राहुल एकटाच उतरल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला सापडला होता. दर्शना १२ जूनपासून बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांकडे दिली होती. दर्शना बेपत्ता झाल्यानंतर राहुल पसार झाला होता.