त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे
कुंभमेळा जागतिक स्तरावर पोहोचला आहे. मागील कुंभमेळ्यापेक्षा येणारा कुंभमेळा भव्यदिव्य व्हावा, यासाठी आपसातील मतभेद व स्वार्थ विसरुन सर्वांनी एकत्र यावे, आखाडा परिषद सर्व ताकदीनिशी आपल्या पाठीशी सदैव उभी राहील. असे प्रतिपादन आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरी महाराज यांनी केले. नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळा नियोजन बैठकीत ते बोलत होते.
त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा सन २०२७ – २८ साली संपन्न होत आहे. त्यादृष्टीने शासनाला प्रस्ताव देण्यासाठी विविध आखाड्यांचे साधुमहंत, माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या एका बैठकीचे आयोजन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जुना आखाड्याचे संरक्षक तथा आंतरराष्र्टीय महामंत्री महंत हरिगिरी महाराज हे होते. आखाडा परिषदेचे सचिव शंकरानंद सरस्वती महाराज, श्रीपंच दशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज, नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डाॅ. श्रीया देवचके, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, महंत गिरीजाशंकर सरस्वती, महंत दुर्गानंद ब्रह्मचारी, महंत निलकंठगिरी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक तथा सुत्रसंचलन जेष्ठ नेते सुरेशतात्या गंगापुत्र यांनी केले.
त्र्यंबकेश्वर हे दक्षिण भारतातील कुंभमेळ्याचे एकमेव ठिकाण आहे, इतर तिन ठिकाणी खास मेळा अॅक्ट लागु आहे, तो इथे सुध्दा लागु व्हावा, असे प्रतिपादन राजेश दिक्षित यांनी केले. माजी नगरसेवक सागर उजे यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्हावे, तिनही टाक्यांचे पाणी एकत्र आणण्यासाठी नियोजन करावे असे सांगितले. जेष्ठ नागरीक मधुकर कडलग यांनी भाविकांना शाही पर्वणी बघता यावी यासाठी शाहीमार्गाच्या दुतर्फा सोय करावी असे मत मांडले. नगर परिषदेचे उत्पन्न जास्त नसल्याने पाणी पुरवठ्याचे बील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट भरणार असल्याचे विश्वस्त संतोष कदम यांनी सांगितले. महंत शंकरानद सरस्वती महाराज यांनी गावातील स्वच्छता, अतिक्रमण, शौचालयं, मटणविक्रीचे दुकाने अशा विविध विषयांवर चांगलीच कानउघडणी केली. महामण्डलेश्वर शिवगिरीजी महाराज यांनी नगरपरिषदेला साधुंची किंमत नाही, यामुळे एकतरी साधु नगरसेवक व्हावा, असे मत व्यक्त केले. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, गिरीश जोशी, एन.डी. गंगापुत्र, सुयोग वाडेकर, राजेंद्र शिरसाट, कल्पेश कदम, दिपक लोणारी, शांताराम बागुल, संजय कदम, दिनेश पाटील, त्रिविक्रम जोशी, ऊमेश सोनवणे, आदींसह विविध साधुंनी आपापले विचार मांडले. मागील पंचवार्षिकचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी डिपीआर तयार असुन मागील पंचवार्षिक मध्ये केलेल्या कामांची व नियोजनाची माहिती दिली. प्रशासक तथा मुख्याधिकारी डाॅ. श्रीया देवचके यांनी पाणी पुरवठा लवकरच दैनंदिन करु, अतिक्रमाणावर त्वरीत कार्यवाही करु असे सांगितले.
यावेळी नगर परिषदेचे अधिकारी अभिजित इनामदार, ठाकरे, पायल महाले, शशिकांत भालेराव, राजेश आहिरे, अमोल जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.