मुंबई/एनजीएन नेटवर्क
जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाला आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. त्यानंतर आरपीएफ जवान चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारून फरार झाला. मात्र, भायंदर येथे अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई ( गाडी क्र. १२९५६ ) ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन याने एएसआय टिकाराम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार केल्यानंतर बोरिवली स्थानकापूर्वी गाडीचा वेग मंदावल्यानंतर आरपीएफ जवान चेतन गाडीमधून उडी टाकून फरार झाला होता. यानंतर ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली असून, ४ जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपी आरपीएफ जवान चेतनला भायंदर येथे अटक करण्यात आली आहे.