- भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांतील गटबाजी उफाळली
- भाजप शहराध्यक्ष पायउतार; सेना नगरसेविकेची जाहीर नाराजी; गटनेते पदावरून राष्ट्रवादी दुभंगली
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महापालिका निवडणुकीनंतर महापौर -उपमहापौर निश्चितीला काही तास बाकी असताना सत्ताधारी भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांतील गटबाजी उफाळून आली आहे. महापौर -उपमहापौर पदांसाठी पक्षनेतृत्वाने निश्चित केलेली नावे बासनात गुंडाळून वेगळीच नावे जाहीर केल्याच्या नाराजीतून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे उपमहापौर पदासाठी उमेदवारी नाकारल्याने शिवसेना नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी स्थानिक नेतृत्वासोबत जाहीर वाद घातला, तर गटनेते पदावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी स्थानिक नेतृत्वाला जाहीर दूषणे दिली.
नाशिकच्या महापौर -उपमहापौर पदांचा फैसला येत्या ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार करीत ७२ जागा मिळवल्याने या पक्षाचा महापौर होणार, हे निश्चित आहे. पक्षाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी या पदांसाठी अनुक्रमे हिमगौरी आहेर -आडके आणि मच्छिंद्र सानप यांची नावे जाहीर करण्यात आली. तथापि, पक्षनेतृत्वाकडून आलेली नावे वेगळीच असताना स्थानिक पातळीवर त्यामध्ये बदल करण्यात आल्याचा दावा करीत शहराध्यक्ष सुनील केदार हे तडकाफडकी पदावरून पायउतार झाले. मात्र, पक्षनेतृत्वाकडून आलेली नावे नेमकी कोणती, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. आता केदार यांची मनधरणी केली जावून त्यांना पदावर कायम ठेवले जाते की नवा अध्यक्ष नेमला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शिवसेनेतही नाराजीनाट्य
शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी आपल्या नावावर निश्चिती झाली असताना ऐनवेळी त्यात खोड घातल्याचा जाहीर आरोप नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी केल्याने या पक्षातील विसंवाद चव्हाट्यावर आला. या पदासाठी मटाले यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा असताना पक्षाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आणि ज्येष्ठ नगरसेवक विलास शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या प्रकाराने मटाले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पक्षात नव्याने आलेल्यांना पडे बहाल केली जात असल्याचा आरोप सुवर्ण मटाले यांनी यावेळी केला.
गटनेते पदावरून राष्ट्रवादीत फूट
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शब्द दिलेला असताना पक्षाच्या गटनेतेपदी आपली वर्णी न लावता नाव बदलण्यात येवून सीमा ठाकरे यांचे नाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी केल्याने पक्षातील बेदिली समोर आली. पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर आपल्या मुंबई भेटीत गटनेतेपदाचा शब्द दिल्याचा दावा डॉ. पाटील यांनी केला. मात्र, ऐनवेळी सीमा ठाकरे यांच्याकडे हे पद गेल्याने डॉ. पाटील यांनी तीव्र शब्दांत नरजी व्यक्त करीत या बदलाला स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याचा जाहीर आरोप केला.
Comments are closed.