NGN News
Latest Marathi News

कांदा खरेदीबाबत शाश्वत निर्णय घ्या : बाळासाहेब थोरात यांचा इशारा

आंदोलन तीव्र करणार; कॉंग्रेसचा नाफेडच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

सध्या कांदा दराबाबत शेतकरी प्रचंड चिंतेत असून त्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक बाजारात कांदा दर १० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. या परिस्थितीला केंद्र आणि राज्य शासन जबाबदार असून तत्काळ शाश्वत निर्णय घेवून या घटकाला दिलासा देण्याची गरज आहे. स्थानिक बाजारात कांदा दर १० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. दोन्ही शासनांनी तातडीने पावले न उचलल्यास कॉंग्रेस पक्ष यापुढे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या वतीने दिला.

कांदाप्रश्नी आज नाशिकमध्ये नाफेडच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. शोभा बच्छाव, पक्षाचे ज्येष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, आकाश छाजेड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. कांदा हा नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, लाखो शेतकरी, मजूर व कामगार वर्गाच्या उपजीविकेचे ते साधन आहे. यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित यंत्रणांनीही या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा थोरात यांनी दिला. मोर्चाच्या वतीने विभागीय व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

७० टक्के कांदा शिल्लक..

निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कांदा खरेदी नाफेड मार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव पद्धतीने करण्यात यावी, कांद्याला किमान रु. 3000 प्रति क्विंटल हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 500 रुपये अनुदान द्यावे, जिल्ह्यात अजूनही ७० टक्के कांदा शिल्लक असल्याने आणखी ३ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करावी, कांदा पिकासाठी किमान आधारभाव (MSP) निश्चित करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चामध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले.

Comments are closed.