पुणे/एनजीएन नेटवर्क
अखेर मान्सून राज्यात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचे आज महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनने व्यापाला आहे. संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. याबाबत हवामान तज्ज्ञ के. एस होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
पुढील दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र त्याआधीच आज मान्सून राज्यात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनने व्यापला आहे. महाराष्ट्रात प्रमाणेच संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या काही भागात देखील मान्सूनचे आगमन झाले आहे. मात्र संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमार किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे. या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू राहील.