नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या पत्रावर सही केली आहे. आज मुंबईत झालेल्या बैठकीला त्यांनी प्रकृतीचे कारण देत जाणे टाळले. तथापि गेल्या रविवारी अर्थात २ जुलैला नेमके काय घडले, याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.
आ. आहिरे म्हणाल्या, आपण अजित पवार, शरद पवार यांचीही भेट घेतली तर खा. सुप्रिया सुळें आणि जयंत पाटील यांच्याशीही माझे बोलणे झाले. माझ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार एकच नाणे आहेत. आम्ही पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा परिवार आहे. मी आमच्या परिवाराबरोबर आहे. आज दोन वेगवेगळे मेळावे पार पडले. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने भूमिका स्पष्ट करणार आहे, असे आ. सरोज अहिरे यांनी सांगितले. शपथविधीच्या दिवशी मी अजित पवारांबरोबर मी राजभवनावर गेले. तिथे शपथविधी पार पडला. मी त्या कार्यक्रमालाही गेले होते. पण नंतर मी तिथून निघाले. त्यानंतर मी सुप्रिया सुळेंना भेटले.
आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही आंधळेपणाने विश्वासाने सही केली होती. मी एकटीनेच सही केली नाही तर अनेक आमदारांनी सह्या केल्या. सह्या झाल्यानंतर जेव्हा राजभवनाकडे चला असं सांगितल्यावर थोडा मनात विचार आला की हे सगळं काय चाललं आहे? त्यानंतर मी दादांशी बोलले. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. मी माझ्या मनातल्या संभ्रमाविषयी शरद पवार यांच्याशीही बोलले. जे काही झाले त्याला मी विश्वासघात म्हणणार नाही. मात्र जे काही झाले ते मी माझ्या मतदारसंघात बोलणार आहे त्यानंतर मी पुढचा निर्णय घेणार आहे असंही सरोज अहिरे यांनी सांगितलं.